मुंबई - एनसीबीने अमली पदार्थ प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह अनेकांना अटक केली होती. जवळपास तीन महिन्यांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष एनडीपीएस कोर्टाने शोविकला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. रियासह काही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने ७ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला होता. मात्र, रियाचा भाऊ शोविक आणि अन्य काहींचे जामीन अर्ज फेटाळले होते.
शोविकला मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनडीपीएस कोर्टाकडून ५० हजारांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच त्याचा पासपोर्ट तपासयंत्रणेकडे जमा करण्याचे निर्देश देऊन मुंबईबाहेर जाताना परवानगी आवश्यक शर्त कोर्टाने ठेवली आहे. तसेच कोर्टाने पुढील सहा महिने महिन्याच्या पहिल्या सोमवारी तपास यंत्रणेसमोर हजेरी लावणे अनिवार्य असल्याचं सांगितलं आहे.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यूचा तपास करत असताना सीबीआयच्या विशेष पथकाला तपासादरम्यान ड्रग्जसंबंधी रिया आणि सुशांतच्या हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांच्यातील चॅटची माहिती मिळाली होती. त्यावरून एनसीबीने तपास सुरू केला होता. या दरम्यान, एनसीबीने ड्रग्ज पुरवणाऱ्या दोन मोठ्या दलालांना वांद्रे परिसरातून अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीने शोविक व सॅम्युअलला समन्स बजावले होते. त्यानंतर सॅम्युअल हा दलालांकडून ड्रग्जचा साठा मिळवत होता आणि हे ड्रग्ज शोविकमार्फत रियाला पुरवत होता.