उत्तर प्रदेशच्या मैनपूरी पोलिसांनी ४० वर्षापासून मंदिरात वेष बदलून पुजारी म्हणून वावरणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीवर तब्बल ४ जणांची हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपी यतेंद्रला ४० वर्षापूर्वी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मैनपुरीच्या नगला तारा गावांत १९७८ मध्ये ४ लोकांची यतेंद्रनं हत्या केली होती. या हत्येनंतर पोलिसांनी यतेंद्रला अटक करून जेलमध्ये पाठवलं होतं.
परंतु १९८१ मध्ये हायकोर्टाने यतेंद्रला अटीशर्थीवर जामीन मंजूर केला होता. जामीन मिळताच यतेंद्र फरार झाला. त्यानंतर वेषांतर करून यतेंद्र ४० वर्ष पोलिसांच्या तावडीतून सुटला. मैनपुरी पोलिसांनी यतेंद्रला पकडून देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस घोषित केले होते. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी यतेंद्रला पुन्हा बेड्या ठोकल्या.
काय आहे हे प्रकरण?
मैनपुरी येथे ५ जून १९७८ मध्ये जमिनीच्या वादावरून नंगला तारा गावांत ४ जणांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. मदन सिंह, महेंद्र सिंह, सरमन आणि ललित यांच्यावर यतेंद्र आणि त्याच्या ५ साथीदारांनी गोळीबार करून सामुहिक हत्या केली होती. या सहा आरोपींपैकी एकाला कोर्टाने निर्दोष ठरवलं. तर १९८१ मध्ये जनपद न्यायालयाने पाच आरोपींना दोषी ठरवून आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. या दोषींनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपील केले होते. तेव्हा हायकोर्टाने ५ जणांना जामीन दिला. त्यानंतर पीडित सुप्रीम कोर्टात पोहचले. कोर्टाने कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असल्याचं म्हटलं.
त्यानंतर या ५ आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी पुन्हा पकडलं या दोन्ही आरोपींचा फतेहगड कारागृहात मृत्यू झाला. तर तिघं आरोपी रामकृपाल, यतेंद्र आणि गजेंद्र हे १९८१ पासून बेपत्ता झाले. कोर्टाने वारंवार पोलिसांना दोषींना अटक करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी तिघांवर प्रत्येकी १० हजारांचे बक्षीस ठेवले. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार यतेंद्र पुजारी हा वेश बदलून स्थानिक मंदिरात राहत असल्याचं कळालं. तर लखनौ येथे त्याचा मुलगा आणि पत्नी राहते. पोलिसांनी यतेंद्रला अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, यतेंद्र कामख्या मंदिरात पुजारी बनून राहत होता. तर त्याचं कुटुंब लखनौ येथे वास्तव्यास होते. कधीकधी यतेंद्र त्याच्या कुटुंबांना भेटण्यासाठी लखनौला जात होता. कामख्या मंदिराची पुजारी म्हणून तो नाव बदलून राहत होता. पोलिसांनी त्याचा खुलासा केला नाही. आता पोलीस इतर दोन फरार आरोपींच्या शोधात आहेत.