मुंबई : काश्मीरमधील बहुचर्चित ३७० कलम हटविण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाचे पडसाद देशभरात उमटण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तविली आहे. त्यापार्श्वभूमीवर मुंबईसह संपूर्ण राज्यात दक्षता बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. महत्वाच्या ठिकाणाची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून पोलिसांना सतर्कता बाळगण्याची सूचना देण्यात आली आहे.केंद्रीय गृहमंत्री बहुचर्चित ३७० कलम हटविण्याबाबतचा विधेयक सोमवारी संसदेत मांडले. देशभरातून त्याचे स्वागत होत असलेतरी काही पक्ष, संघटनांनी त्याला विरोध दर्शविला आहे. काहीकडून त्या विरोधात निदर्शने, आंदोलन करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर आगामी बकरी ईद, गणपती, दही हंडी आदी सणासुदीच्या काळात सार्वजनिक शांततेमध्ये कसलाही भंग होवू नये, कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी विशेष दक्षता बाळगण्याच्या सूचना पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार महत्वाची ठिकाणे, पर्यटन स्थळे, रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी गस्त घालण्यात येत आहे.