जयपूर : सरकारी शाळेतून काढून टाकल्यामुळे अस्वस्थ झालेल्या बारावी वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्याने शिक्षक नटवर यादव (४५) यांच्यावर गोळी झाडली. गुरुवारी दुपारी हा प्रकार येथील कोटपुतली तहसीलमध्ये नारेदा भागाजवळ घडला. बराच रक्तस्राव झाल्यामुळे यादव यांना आधी स्थानिक रुग्णालयात व नंतर विशेष उपचारांसाठी येथील एसएमएस रुग्णालयात हलवण्यात आले आहे.हा विद्यार्थी शिक्षकांशी नेहमी भांडायचा म्हणून गेल्या वर्षी त्याला शाळा सोडल्याचा दाखला शिक्षकाने दिला होता. नारेदात रस्त्याने यादव दुचाकीने घरी जात असताना दोन अल्पवयीन युवकांनी त्यांना अडवले व त्यातील एकाने त्यांच्यावर गोळी झाडली. हरयाणातील या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.” आरोपी मुलाचे शिक्षकांशी नेहमी भांडण व्हायचे. शाळा सोडल्यानंतर तो राजसमंद जिल्ह्यात काम करण्यासाठी गेला. तेथे त्याचे सगळे मित्र बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले होते. त्याला राग आला व त्याने शिक्षक यादव यांना धडा शिकवण्याचे ठरवले.
नेमके झाले काय?मुलाने यादव यांना गुणपत्रिका मागितली होती. त्यांनी त्याला खडसावले. त्यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. नंतर त्याने त्यांच्यावर गोळी झाडली. यादव हे १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांना इतिहास शिकवतात. या विद्यार्थ्याला शाळेतून का काढून टाकले याचा तपशील यादव यांना विचारल्यावर ते वेदनांमुळे काही सांगू शकले नाहीत.