मंदसौर - पहिल्या पत्नीसोबत पुन्हा जवळीक वाढल्यामुळे तिच्या प्रेमात वेडा होऊन पतीने त्याच्या दुसऱ्या पत्नीपासून सुटका व्हावी यासाठी विषारी प्लॅन आखला. दुसऱ्या पत्नीची हत्या नैसर्गिक मृत्यू वाटावा म्हणून आरोपीने काही तासांच्या अंतराने दोनदा विषारी साप तिच्यावर अंगावर सोडले. या सापांनी तिचा चावा घेतला. त्याचसोबत विषारी इंजेक्शनही दिले. तरीही तिचा मृत्यू झाला नाही.
शेजारी आणि कुटुंबीयातील सदस्यांच्या वेळीच या महिलेला हॉस्पिटलला पोहचवल्यामुळे तिचा जीव वाचला. मात्र विषाचा परिणाम तिच्या पायावर गंभीर जखम झाली. ७ महिन्यापासून तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, जर पाय ठीक झाला नाही तर कापावा लागेल. तर पीडित महिलेच्या वडिलांनी मुलीसाठी न्यायाची मागणी केली आहे. या संपूर्ण षडयंत्राला जबाबदार असणाऱ्या आरोपी पती आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. कुटुंबाला लवकरच न्याय मिळण्याची अपेक्षा आहे.
हैराण करणारे हे प्रकरण मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील आहे. याठिकाणी यशोधर्मन नगर हद्दीतील माल्याखेडी गावात मोजिम अजमेरी दुसरी पत्नी हलीमा आणि ५ वर्षाच्या मुलासह राहत होता. ८ वर्षापूर्वी तस्करी प्रकरणात मोजिमला जेलची शिक्षा झाली. त्यानंतर मोजिम जेलमध्ये गेला असता त्याची पहिली पत्नी परपुरुषासोबत पळून गेली. मोजिम जेलमधून बाहेर आला. त्यानंतर हलीमा नावाच्या मुलीशी त्याने लग्न केले. मागील ७ वर्षापासून ते एकत्र राहतायेत. त्यांना ५ वर्षांचा मुलगाही आहे.
पहिल्या पत्नीशी जवळीक, दुसऱ्या पत्नीचा छळकाही दिवसांपूर्वी मोजिमची जवळीक त्याच्या पहिल्या पत्नीसोबत वाढली. याची माहिती दुसरी पत्नी हलीमाला मिळाली. यावरून दोघांमध्ये वाद होऊ लागला. भांडणात संतापलेला मोजिम हलीमाला मारहाण करत होता. मुलाच्या भवितव्यासाठी हलीमा पतीकडून होणारा छळ सहन करत राहिली. पण दिवसेंदिवस होणार भांडण आणि पहिल्या पत्नीच्या प्रेमात वेडं लागलेल्या मोजिमनं हलीमाचा काटा काढण्याचं ठरवलं. त्यानं साथीदार रमेशसह मिळून हलीमाची हत्या करण्याचा प्लॅन रचला.
रमेशला सापांची माहिती होती हे मोजिमला माहीत होते. त्याने रमेशला विषारी साप आणायला सांगितला. ८ मे २०२२ रोजी रमेश पिशवीत विषारी साप घेऊन मोजिमच्या घरी पोहोचला. इकडे आल्यानंतर त्यांनी संपूर्ण घराची लाईट बंद केली. हलीमाने याचे कारण विचारले असता मोजिमने तिला काही तातडीचे काम असल्याचे सांगून झोपण्यास सांगितले. हलीमा झोपायचा प्रयत्न करत होती. तेव्हा नवरा आणि त्याचा मित्र रमेश सापाबद्दल बोलत असल्याचे तिने ऐकले. हलिमा कुठे आहे, तिला साप चावावा लागेल असं बोलणं तिने ऐकलं.
हे ऐकून हलीमाने घरातील लाईट लावली आणि ओरडत होती. तेव्हा पती मोजिमने तिचे तोंड बंद केले आणि मित्र रमेश याने पिशवीतून विषारी साप काढला. या सापाने हलीमाच्या पायाला दंश केला. सापाच्या विषामुळे हलीमा बेशुद्ध झाली. ९ मे रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास तिला शुद्ध आली तेव्हा परत दोघांनी मिळून हलीमाच्या पायाला दंश करायला साप तिच्या अंगावर सोडला. त्यानंतर विषारी इंजेक्शनही दिले.
हलीमा बेशुद्ध झाल्यानंतर ती मृत झाल्याचं दोघांना वाटले. त्यामुळे ते बाहेर पडले. मात्र हलीमाला पुन्हा शुद्ध आली. ती त्याच अवस्थेत शेजाऱ्यांकडे पोहचली आणि त्यांच्याकडे मदतीची विनंती केली. हलीमाची अवस्था पाहून शेजाऱ्यांनी तिच्या घरच्यांना कळवलं आणि हॉस्पिटलला उपचारासाठी नेले. त्यामुळे हलीमाचा जीव वाचला.