मुंबई - गुडविन ज्वेलर्स प्रकरणानंतर आता घाटकोपर पूर्व येथील रसिकालाल सकलचंद ज्वेलर्सचे दुकान बंद झाल्याने गुंतवणूकदारांनी पोलीस गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पंतनगर पोलीस ठाण्यात रसिकलाल ज्वेलर्सविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात, ३०० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
रसिकालाल सकलचंद ज्वेलर्सने विविध योजना, तसेच आगाऊ पैसे देऊनही दागिने दिले नाहीत, तसेच ग्राहकांचे पैसे घेऊन त्यांना त्याचा लाभ ही न दिल्याने ग्राहक त्रस्त होते. त्यातच गेले चार ते पाच दिवस हे दुकान बंद झाले. त्यात विविध संदेश व्हायरल झाल्याने गुंतवणूकदारांनी थेट पोलिसांत धाव घेतली. या ज्वेलर्सचा मालक जयेश शहा, त्याचे संचालक आणि कर्मचारी यांच्या विरोधात तक्रार दिली. या प्रकरणात आतापर्यंत ५ ते ६ तक्रारी दाखल आहेत. गेल्या चार वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती समजते. त्यापैकी काही तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडेही करण्यात आल्या आहेत. फसवणुकीचे स्वरूप पाहता हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात येत आहे. गुन्हा दाखल केल्याच्या वृत्ताला पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय भालेराव यांनी दुजोरा दिला.