नागपूर : वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादात सोमवारी रात्री सख्ख्या मोठ्या भावाला चाकूने भोसकून ठार मारणाऱ्या आरोपीला त्याच्या तीन साथीदारांसह पोलिसांनी मंगळवारी पहाटे मोर्शीत (जि. अमरावती) अटक केली. या मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जय हिंद नगरात सोमवारी रात्री ही थरारक घटना घडली होती. अमीन अली सय्यद अली (वय ४१) असे मृताचे नाव आहे.
अमीनचे मानकापुरात वडिलोपार्जित दुमजली घर आहे. एक भाऊ खाली तर दुसरा वरच्या माळ्यावर राहतो. तेथे दोन दुकाने भाड्याने दिलेली आहे. दोन्ही दुकानाचे भाडे अमीन स्वतःच घेत होता. त्याचा लहान भाऊ आरोपी सय्यद आसिफ सय्यद अली एका दुकानाचे भाडे मिळावे म्हणून अमिनसोबत भांडायचा. यावरून गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास या वादाला पुन्हा तोंड फुटले. दुकानाचे भाडे आणि मालमत्तेची हिस्सेवाटनी करायला अमीन तयार नसल्यामुळे त्यांच्यात हाणामारी झाली. आधीच तयारीत असलेला आरोपी आसिफ, त्याचा मेव्हणा जावेद खान हबीब खान आणि त्याचे मित्र तमीज खान हफिज खान तसेच सादिक खान हबीब खान यांनी अमीनवर चाकूने हल्ला केला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे रात्री उशिरा त्याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मानकापूरचे ठाणेदार गणेश ठाकरे आणि त्यांचा ताफा, गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक भानुदास पिदूरकर तसेच परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त विनिता शाहू आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. तेथील सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींचे मोबाईल नंबर मिळवून पोलिसांनी मोर्शी येथे धाव घेतली. तिथे सासरवाडीत लपून बसलेला मुख्य आरोपी आसिफ, त्याचा मेव्हणा जावेद आणि जावेदचे मित्र तमीज तसेच सादिक या चौघांना पोलिसांनी अटक केली.१५ दिवसांपासून होता तयारीत आरोपी आसिफ हा अमीनची हत्या करण्यासाठी खूप दिवसांपासून तयारीत होता. १५ दिवसांपूर्वी असाच वाद झाल्यामुळे अमीन याने आरोपी आसिफला ठोसा लगावला होता. आसिफच्या तक्रारीवरून त्यावेळी मानकापूर पोलिसांनी कलम ३२५ अन्वये गुन्हाही दाखल केला होता. तेव्हापासून आसिफ अमिनचा काटा काढण्याच्या तयारीत होता. सोमवारी त्याने मेव्हणा आणि त्याच्या दोन मित्रांना नागपुरात बोलवून घेतले. आणि अमिनची हत्या केली.गुन्ह्यात वापरलेली कार जप्त पोलिसांनी या प्रकरणी आलिया अली अमीन अली हिच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. त्यांनी या गुन्ह्यात वापरलेली सँट्रो कारही जप्त केली. पोलीस उपायुक्त विनिता शाहू, गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहायक आयुक्त विलास सोनवणे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गणेश ठाकरे, भानुदास पिदुरकर, उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, युवराज सहारे, कैलास मगर, प्रसाद रणदिवे, अमित मिश्रा, लक्ष्मी तांबूसकर, हवालदार रवींद्र भुजाडे, रामेश्वर गीते, संतोष मदनकर, अरविंद झिलपे, नायक अंकुश राठोड, राजेश्वर वरठी, अजय पाटील, रवी शाहू, रोशन वाडीभस्मे, हितेश कुंडे, शेषराव राऊत, योगेश गुप्ता आणि महिला शिपाई कविता दुर्गे यांनी ही कामगिरी बजावली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
६ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून केले लैंगिक शोषण, ४ दिवसांनंतरही आरोपी फरार
दुर्दैवी अंत! लाकडाच्या ढिगाऱ्यावर कुत्रा चढल्याने दोन मुलींचा मृत्यू
IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर अनिश्चिततेचे सावट, अद्याप ठोस निर्णय नाही
सख्ख्या भावाने भावाला चाकूने भोसकले, मानकापूरातील घटना
Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी