बाराबंकी – यूपीच्या बाराबंकी इथं मोठ्या बहिणीनं लहान बहिणीसोबत झालेल्या वादातून तिची हत्या केली आहे. १२ वर्षीय लहान बहिणीची रॉड मारून तिला ठार केले. त्यानंतर मृत बहिणीचा मृतदेह पोत्यात बांधून घरातील एका रुममध्ये दफन केला. परंतु २-३ दिवसाने घरात दुर्गंधी येऊ लागल्याने मोठ्या बहिणीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला आणि अनेकांना धक्का बसला.
घरातील लहान मुलगी २ दिवसांपासून बेपत्ता असल्याने घरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सर्वत्र तिचा शोध घेतला जात होता. त्यावेळी घरातील एका कोपऱ्यातून दुर्गंध येत असल्याचं आढळलं. जेव्हा त्या जागेवर खोदकाम केल्याचं पाहिलं तेव्हा माती काढण्यात आली तेव्हा पोत्यात बांधलेला मृतदेह आढळला. तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमोर्टमला पाठवला. तर त्याचवेळी आरोपी मोठी बहीण घटनास्थळावरून पसार झाली. ही घटना फतेहपूरच्या खन्ता मजरे गावातील आहे.
बाराबंकीमधील फतेहपूर कोतवाली क्षेत्रातील गावातील या घटनेने सगळेचे हैराण झालेत. मोठ्या बहिणीनं लहान बहिणीची हत्या करून तिचा मृतदेह घरातच दफन केला होता. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेचा खुलासा शुक्रवारी झाला. गावातील रहिवासी कल्लू रावत हे मजुरीचं काम करायचे. मजुरीच्या निमित्ताने ते नेहमी घराच्या बाहेर असायचे. मजुराच्या मोठ्या मुलीचं किरणसोबत लग्न झालं होतं. परंतु काही दिवसांनी सासरहून परतून मुलगी माहेरी येऊन राहत होती. घरात १२ वर्षीय छोटी मुलगी गायत्रीही राहत होती. बुधवारी रात्रीपासून गायत्री बेपत्ता झाली होती.
बहिणीचा शोध घेत असताना घरातील एका रुममध्ये दुर्गंधी येत असल्याने पाहिलं असताना पोत्यात बांधलेल्या अवस्थेत गायत्रीचा मृतदेह आढळला. बुधवारी रात्री गायत्री आणि मोठ्या बहिणीत वाद झाला होता. त्या वादातून मोठ्या बहिणीने लहान बहिणीवर हल्ला केला. त्यानंतर तिची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर घरातील एका खोलीत जमीन खोदून मृतदेह पोत्यात बांधून दफन केला. घरच्यांना याची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना बोलावलं. तोपर्यंत संधीचा फायदा घेऊन मोठी बहीण फरार झाली लवकरच आरोपीला अटक करू असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.