भिवंडी - कोरोनाच्या गंभीर समस्येकडे प्रशासकीय व वैद्यकीय यंत्रणा तत्पर झाली असून संपूर्ण देश या कोरोना विरोधातील लढाईत एकत्र आहे, याची जाण जगाला करून देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लाईट बंद करून दिवे लावण्याचे देशवासीयांनी आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाला काल देशभर प्रतिसाद मिळाला ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये या वेळेस थेट वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. याच दरम्यान तालुक्यातील पिंपळास गावातील पोलीस पाटील अशोक जाधव यांच्या घरावर काही हुल्लडबाज समाज कंटकांनी दगडफेक केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपळास गावातील नागरिकांनी वीज पुरवठा खंडित केला होती याचा फायदा घेत पोलीस पाटील यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. लॉकडाऊन काळात गावात दारू विक्री होऊ नये तसेच गावातील काही मोकाट मुळे चौका चौकामधे फिरत असतात व गर्दी करुन टवाळक्या करत असल्यामुळे पोलीस पाटील त्यांना गावात फिरण्यास मनाई करत होते.
पोलिसांसोबत जनजागृती करीत असल्यामुळे पोलीस पाटील यांच्या घरावर दगड फेक केल्याचा संशय पोलीस पाटील अशोक जाधव यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी तीन समाजकंटकांवर कोनगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली असता कोनगाव पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.