नवी दिल्ली - दंगल गर्ल गीता आणि बबीता फोगट (Geeta and Babita Phogat Sister) यांच्या मामे बहिणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुस्तीच्या सामन्यात पराभव झाल्याने तिने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. कुस्तीच्या अंतिम सामन्यात झालेला पराभव ती स्वीकारू शकली नाही. त्यामुळे तिने सोमवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. संबंधित महिला कुस्तीपटू गेल्या अनेक वर्षांपासून आपले महाबीर पैलवानच्या यांच्या घरी कुस्तीचा सराव करत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, बबीता फोगाटच्या 17 वर्षीय मामे बहिणीचं नाव रितिका असं आहे. ती राजस्थानच्या झंझनू जिल्ह्यातील जैतपूर या गावातील रहिवासी आहे. मृत रितिका द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महाबीर पैलवान यांच्या कुस्ती अॅकॅडमीत गेल्या अनेक वर्षांपासून सराव करत होती. काही दिवसांपूर्वी रितिकाने भरतपूरच्या लोहागड स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय उप-कनिष्ठ, कनिष्ठ महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. यावेळी अंतिम सामन्यात रितिकाला एका गुणाने पराभव पत्करावा लागला.
हा पराभव तिच्या जिव्हारी लागला होता. यावेळी स्टेडियममध्ये महाबीर फोगट देखील उपस्थित होते. अंतिम सामन्यात झालेला पराभव रितिकाच्या जिव्हारी लागल्याने तिने 15 मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास महाबीर फोगट यांच्या बलाली गावातील राहत्या घरात आत्महत्या केली आहे. तिच्या खोलीतील पंख्याला ओढणी बांधून तिने आपलं आयुष्य संपवलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पहिलवान रितिकाने 15 मार्च रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घरातील एका खोलीत ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
...अन् कुस्तीच्या सामन्यात एका गुणाने झालेला पराभव लागला जिव्हारी
रितिकाच्या मृतदेहावर दादरी येथील सिव्हील रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं असून पोलिसांनी मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केला आहे. यावेळी डीएसपी राम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाचं शवविच्छेदन झालं असून पार्थिव कुटुंबीयांच्या स्वाधीन केलं आहे. भरतपूर या ठिकाणी पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत रितिकाचा अवघ्या एका गुणाने पराभव झाला होता. याचा तिला चांगलाचं धक्का बसला होता. या धक्क्यातून तिने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.