राजस्थानच्या चुरूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमविवाहानंतर एका कपलच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्रेमविवाहामुळे संतप्त झालेल्या तरुणीच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तसेच धमकी देखील दिली. दुसरीकडे मुलीचा शोध घेत असताना नागौर पोलीस चुरूला पोहोचले तेव्हा हे कपल घाबरलं. त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे जाऊन संरक्षणाची याचना केली आहे. चार-पाच दिवसांपूर्वीच या जोडप्याचा विवाह झाला. पोलिसांनी त्यांना सुरक्षेचे आश्वासन दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागौर जिल्ह्यातील गोठडी गावातील गुड्डी या तरुणीने चुरू जिल्ह्यातील खसोली गावातील उदेशसोबत प्रेमविवाह केला आहे. त्यांच्या लग्नाची माहिती मुलीच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचताच त्यांनी दोघांनाही धमकावले. यामुळे कपल घाबरले. त्यानंतर धाडस दाखवत त्यांनी सुरक्षेची मागणी करत चुरूचे पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. यावेळी या जोडप्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती.
प्रेमविवाह करणाऱ्या गुड्डीने सांगितले की, दोघेही अडीच वर्षांपूर्वी ते सालासर मंदिरात पहिल्यांदा भेटले होते. तिथे दोघांची मैत्री झाली. त्यानंतर दोघेही फोनवर बोलू लागले. या मैत्रीचे प्रेमात कधी रुपांतर झाले ते कळलेच नाही. प्रेम फुलल्यावर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. गुड्डीने सांगितले की, तिने चुरूच्या उदेशशी स्वतःच्या इच्छेने लग्न केलं आहे. तिने 12 वी पर्यंत शिक्षण घेतले आहे आणि उदेश पदवीचे शिक्षण घेत आहे.
गुड्डीने सांगितले की, तिने घरच्यांना तिच्या नात्याबद्दल सांगितलं नव्हतं. 31 मे रोजी दोघेही घराबाहेर पडले. तेथून ते गाझियाबादला पोहोचले. तेथे त्यांचा आर्य समाजात विवाह झाला. नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर नागौर पोलीसही रविवारी दोघांच्या शोधात चुरूला पोहोचले. यावर त्यांनी एसपी कार्यालय गाठून सुरक्षेची मागणी केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.