लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : दहीसर येथे झालेल्या अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणासारखीच घटना पुण्यात शनिवारी सायंकाळी घडली. आर्थिक कारणावरुन सराफ व्यवसायिकाने आपल्या दुकानमालकावर भर चौकात गोळीबार केला. त्यानंतर रिक्षातून पोलीस ठाण्यात जात असताना रिक्षामध्ये स्वत: वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. दुकानमालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
अनिल ढमाले (वय ५२, रा. बालेवाडी) असे आत्महत्या केलेल्या सराफ व्यवसायिकाचे नाव आहे. आकाश गजानन जाधव (वय ४२, रा. बाणेर) असे जखमी झालेल्या दुकानमालकाचे नाव आहे. ही घटना बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलजवळील दुर्गा कॅफेजवळ शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
अनिल ढमाले हे सराफ व्यवसायिक आहेत. जाधव यांचे बाणेर येथील हाय स्ट्रीटवर दुकान आहे. जाधव यांनी ढमाले यांना हे दुकान भाड्याने दिले आहे. अनिल ज्वेलर्स म्हणून हे दुकान ढमाले चालवत होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात आर्थिक वाद सुरु होता. शनिवारी सायंकाळी जाधव यांच्या दुचाकीवर बसून ढमाले येत होते. ज्युपिटर हॉस्पिटलजवळ मागे बसलेल्या ढमाले याने जाधव यांच्या डोक्यात आपल्याकडील पिस्तुलातून गोळी झाडली. त्यामुळे दोघेही रस्त्यावर पडले. त्यानंतर ढमाले याने तेथून पळ काढला. त्याने एक रिक्षा केली व रिक्षाचालक सतीश यादव याला रिक्षा चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याकडे घेण्यास सांगितले.
औंध येथील भाले चौकात रिक्षा आली असताना त्याने रिक्षाचालकाला मला पाणी घेऊन ये, असे सांगितले. यादव हे पाणी आणायला गेले. तेवढ्यात ढमाले याने स्वत:वर गोळीबार करुन आत्महत्या केली. रिक्षामध्येच त्याचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. ढमाले याची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे सुसाईड नोट मिळाली. त्यात त्याने तीन महिन्यापासून ढमाले याला जाधव आर्थिक कारणावरुन त्रास देत होता. आता मला पर्याय नाही, म्हणून मी हा निर्णय घेत आहे, असे म्हटले आहे. ढमाले यांच्याकडे पिस्तुलचा परवाना असून त्याच पिस्तुलाने त्याने गोळीबार करुन स्वत:ही आत्महत्या केली आहे.
दरम्यान आकाश जाधव यांच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत.