नाशिक- शहरातील भाजपाचे सातपूर मंडलाचे अध्यक्ष अमोल इघे यांची आज सकाळी हत्या झाली. युनीयनबाजीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय असून आरोपींला तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी भाजपाच्या तीन्ही आमदार आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात साडे चाार तास ठिय्या आंदाेलन केले तसेच शहरात पोलीस आयुक्त हटवण्याची मागणी केली.
नाशिक शहरात गेल्या चार दिवसातील ही तिसरी खुनाची घटना असून त्यामुळे शहरातील कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज सकाळी सातपूर औद्योगिक वसाहतीतील कार्बननाका परीसरात अमोल इघे यांची गळा चिरून हत्या कण्यात आली.कंपनीत महाराष्ट्रवादी कामगार संघ युनियनचे काम करणाऱ्या इघे यांची आणि संशयित आरोपी यांच्यात दुसरी एका युनीयन स्थापनेवरून त्यांचे एकाशी वाद होते.त्यामुळे युनीयनच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय आहे.संबंधीत संशयीत एका राजकीय पक्षाशी संबंधीत असून या हत्येनंतर तो फरार आहे. दरम्यान हल्ल्यानंतर इघे यांना शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले हेाते. मात्र त्यांचा मृत्यू झाला हेाता. या घटनेनंतर त्यांचे कुटूंबिय आणि भाजपचे आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले हे सर्व एकत्र आले आणि जो पर्यंत हल्लेखोरास अटक होत नाही तेा पर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
सातपूर पोलीस ठाण्यात भाजपाचे आमदार शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह सुमारे शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांनी ठाण मांडले आणि शहरात राजरोस हत्या होत असल्याने पेालीस आयुक्त दीपक पांडे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलीस आयुक्तांनी प्रत्यक्ष येऊन हल्ला करणाऱ्यास अटक करण्याचे आश्वासन दिल्या शिवाय हटणार नाही अशी भूमिका आंदाेलकांनी घेतली. पेालीस उपआयुक्त विजय खरात यांनी जमावाची समजूत काढली आणि २४ तासात आरोपीला अटक करण्याचे अश्वासन दिल्यानंतर हे आंदाेलन मागे घेण्यात आले.अर्थात, २४ तासात हल्लेखोराला अटक केले नाही तर नाशिक बंदची हाक देण्यात येईल असा इशारा भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी दिला आहे.