फुलंब्री : सताळा येथे चौका ते लाडसावंगी रस्त्यावर असलेल्या आश्रमातील प्रियशरण महाराजांना अज्ञात सात ते आठ लोकांनी मारहाण केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली असून, फुलंब्री ठाण्यात याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.
चौक्यापासून तीन कि.मी. अंतरावर सताळा गावच्या हद्दीत उंच डोंगरावर प्रियशरण महाराजांचा भव्य इमारतीत बांधलेला आश्रम आहे. मंगळवारी मध्यरात्री अज्ञात ७ ते ८ व्यक्तींनी आश्रमाच्या इमारतीचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. पहिल्या खोलीत एक महिला झोपली होती, तिला धमकावीत महाराज कुठे आहेत, अशी विचारणा केली. तिने वरच्या मजल्यावर असल्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी तिकडे मोर्चा वळविला. यावेळी झोपेत असलेल्या महाराजांना उठवून त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी महाराजांनीही त्यांना प्रतिकार केला. आरोपींनी महाराजांच्या डाव्या दंडावर चाकूने वार करून जखमी केले. यानंतर आरोपींनी तेथून काढता पाय घेतला. या घटनेची माहिती मिळताच फुलंब्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. हल्ल्यात जखमी झालेल्या प्रियशरण महाराजांना औरंगाबादेतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञात सात ते आठ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. डी. डी. वाघमारे पुढील तपास करीत आहेत.एकाही वस्तूला हात लावला नाही.
मंगळवारी रात्री आलेल्या अज्ञात सात ते आठ लोकांनी आश्रमात जाऊन केवळ प्रियशरण महाराजांनाच मारहाण केली आहे. यावेळी त्यांनी आश्रमातील एकही वस्तू सोबत नेली नाही. याचा अर्थ ते चोरीच्या उद्देशाने तेथे आले नव्हते, यामुळे या घटनेमागे वेगळेच कारणे असू शकते, अशी शंका पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी व्यक्त केली आहे. याबाबत सखोल चौकशी करून आरोपींना अटक करू, असे मुदिराज म्हणाले. महाराज मूळचे राजस्थानचे प्रियशरण महाराज हे मूळचे राजस्थान येथील आहेत. गेल्या दहा वर्षांपासून त्यांनी सताळा परिसरात आपला आश्रम थाटला आहे. आश्रमाची इमारत टोलेजंग आहे. या आश्रमात चार महिला, दोन पुरुष महाराजांसोबत राहतात, तर आश्रमानजीक असलेल्या शेतीत काम करणारे काही लोकही तेथे राहतात. महाराजांचा जास्तीत जास्त वेळ हा बाहेरगावी सत्संग करण्यात जातो.