प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: एकीकडे बंद घर चोरटयांकडून फोडली जात असताना दुसरीकडे उघडया दरवाजावाटे घरात घुसून चोरी झाल्याच्या दोन घटना नुकत्याच घडल्या होत्या. यातील एका चोरीच्या गुन्हयाचा पर्दाफाश करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. सुरज उर्फ गोल्डी पटीया नट (वय २६) त्रिमूर्तीनगर, डोंबिवली पूर्व असे चोरटयाचे नाव असून तो आठ दिवसांपूर्वीच तो एका गुन्हयात शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आला होता, त्याच्याकडून १ लाख २४ हजारांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
डोंबिवली पूर्वेकडील सावरकर रोड परिसरातील मंगल आशिर्वाद सोसायटीत राहणारे रितेश मिश्रा यांच्या घराच्या उघड्या राहिलेल्या दरवाजावाटे चोरट्याने घरात घुसून १ लाख ६३ हजारांचे सोने- चांदीचे दागिने आणि रोकड असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी ७.३० ते ७.५० दरम्यान घडली होती. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयाच्या तपासकामी सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे आणि वरीष्ठ पोलिस निरिक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक बळवंत भराडे, पोलिस उपनिरिक्षक अजिंक्य धोंडे, पोलिस हवालदार सुनिल भणगे, सचिन भालेराव, तुळशीराम लोखंडे, विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, निसार पंजारी, पोलिस नाईक हनुमंत कोळेकर, पोलिस शिपाई निलेश पाटील, गिरीष शिर्के, शिवाजी राठोड यांचे पथक नेमले होते. पथकाने तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपीचा कसोशीने शोध घेवून अटक केली. आरोपी सुरजला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.