वसई : वसईतील श्रद्धा वालकर हिच्या निर्घृण हत्येबाबत दररोज वेगवेगळे खुलासे होत आहेत. गेले तीन दिवस दिल्ली पोलिसांनी वसईमध्ये तळ ठोकून आफताब आणि श्रद्धाच्या मित्र मंडळींसह इतर काहींची चौकशी केली. यामध्ये श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने वसईतील भाड्याच्या खोलीतील ३७ बाॅक्स दिल्लीला मागवून घेतल्याचे आणि त्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तीची चौकशी केल्याचे उघड झाले आहे.
आरोपी आफताब पुनावाला याने श्रद्धाच्या हत्येनंतर त्यांच्या वसईतील घरामधील सामान वसईवरून दिल्लीला मागवले होते. ज्या कंपनीने हे सामान दिल्लीला पाठवले होते, त्या कंपनीच्या मालकाची रविवारी दिल्ली पोलिसांनी चौकशी करून जबाब नोंदवला. सलग तिसऱ्या दिवशी दिल्ली पोलिस वसई आणि मीरा रोडमध्ये या प्रकरणाचा तपास करीत आहेत. आफताब आणि श्रद्धा हे वसईतील एव्हरशाइन सिटी येथील एका इमारतीत भाड्याने राहत होते. मे महिन्यात ते दिल्लीला शिफ्ट झाले होते.
दरम्यान, आफताब याने अतिशय शांत डोक्याने १८ मे रोजी श्रद्धा हिची हत्या केली होती. यानंतर ५ जून रोजी आफताबने वसईतील एव्हरशाइन येथील भाड्याच्या घरातील सामान दिल्लीत मागवले होते. मीरा रोड येथील एका कंपनीला हे काम दिले होते. कंपनीच्या गोविंद यादव याची दिल्ली पोलिसांनी चौकशी करून त्याचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्याने सामान शिफ्ट करताना झालेल्या व्यवहाराची पावती पोलिसांना दिली असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीला सामान शिफ्ट करण्यासाठी २० हजार रुपये आफताबने गुगल-पेद्वारे भरले होते. एक आठवड्यात आम्ही सामान दिल्लीला पाठवले, असे यादव याने पोलिसांना सांगितले.
आफताबविरोधात वसईत संताप -- आरोपी आफताबविरोधात वसईत तीव्र संताप व्यक्त होत आहे. श्रद्धा वालकरचा प्रियकर व हत्यारा असलेल्या आफताबला फाशी द्यावी आणि श्रद्धाला न्याय मिळावा, यासाठी वसईकर रविवारी संध्याकाळी रस्त्यावर उतरले होते. स्वस्तिक सेवा संस्थेमार्फत काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात विविध सामाजिक संस्था, नागरिक सहभागी झाले होते.
- आफताबच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी देऊन पुतळ्याला नागरिकांनी चपलेने मारहाण करत संताप व्यक्त केला.