कुंदन पाटील, जळगाव: हद्दपारीची कारवाई केल्याचा राग आल्याने प्रांताधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानात जाऊन ‘दबंगगिरी’ करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या पोलिसांनी रात्रीतूनच मुसक्या आवळल्या आणि त्याची धुळे कारागृहात रवानगी केली. दरम्यान, प्रांताधिकाऱ्यांनी यासंदर्भात रामानंद पोलिसात तक्रार दाखल केली आहे. रात्री उशीरापर्यंत कुठल्याही गुन्ह्याची नोंद नसल्याची माहिती रामानंद पोलिसांनी दिली.
प्रांतधिकाऱ्यांची तक्रार
प्रांताधिकारी महेश सुधाळकर यांनी रामानंद पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिला आहे. त्यात नमूद केले आहे की, शुक्रवारी निवडणुक केंद्राची पाहणी करीत असताना हद्दपार केलेल्या भूषण रघुनाथ सपकाळे (वय ३२) याने मोबाईलवरुन सुधाळकर यांच्याशी संपर्क साधला. भिती निर्माण होईल आणि धाक दाखविण्याचा प्रयत्न करीत त्याने संवाद साधला आणि काय कारवाई केली याची विचारणा केली. तेव्हा सुधाळकर यांनी उद्या कार्यालयात येऊन आदेशाची प्रत घेऊन जा, असे सांगत फोन कट केला. त्यानंतर सपकाळेने एका सहकाऱ्यासोबत शुक्रवारी रात्री प्रांताधिकाऱ्यांचे निवासस्थान गाठले. गेटवरच्या शिपायाला दूर सारत ‘साहेब, कुठे आहेत, असा सवाल केला. सुधाळकर सामोरे गेल्यावर पुन्हा दहशत निर्माण करणारी भाषा वापरली. त्यानंतर परत जाताना ‘दरवाजा उघडा ठेव, पुन्हा येतो, अशा शब्दात शिपायाला सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क
सुधाळकर यांनी घडल्याप्रकाराविषयी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या संपर्क साधला. त्यानंतर डीवाय.एस.पी. संदीप गावीत तत्काळ सुधाळकर यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांनी घडल्याप्रकाराची माहिती जाणून घेतली. त्यानंतर भूषणचा शोध जारी झाला.
भूषणवर अनेक गुन्हे
हद्दपारीची कारवाई झालेला भूषणवर ९ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.जिल्हापेठ पोलीस स्टेशनला खूनासह शहर, तालुका पोलीस स्टेशनला भूषणविरोधात गुन्हे दाखल आहेत.
अधिकाऱ्यांचे धाडसाचे कौतुक : जिल्हाधिकारी
प्रांताधिकाऱ्यांना धमकाविण्याचा प्रकार गंभीर आहे. रात्रीच पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे.वाळूमाफियांचे नाक दाबल्याने त्यांच्या अस्वस्थता पसरली आहे. म्हणून वाळूमाफियांच्या मुसक्या आवळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नक्कीच कौतुक केले पाहिजे. कुठल्याही दबावाला भीक न घालता कारवाई सुरुच ठेवली आहे. तसेच पोलिसांनीही कठोर भूमिका घेतल्याने दोन्ही यंत्रणांवर दबावतंत्राचे अस्त्र उगारले जात आहे. एरंडोल, यावल येथे महिला तहसीलदार असताना त्यांनाही गर्दी करुन भयभीत कसे करता येईल, याचाही डाव रचला जात आहे. मात्र कुठलीही तडजोड करायची नाही आणि करणार नाही, अशी प्रशासनाची भूमिका आहे. त्यामुळे यापुढेही कायद्याचा आधार घेत कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासन तत्पर असेलअशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
रात्री डीवायएसपी संदीप गावीत यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी निवासस्थानाला भेटही दिली. घडल्याप्रकाराविषयी सकाळी रामानंद पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे.- महेश सुधाळकर, प्रांताधिकारी