सूरत - अलीकडेच ओरिसाच्या कटक जिल्ह्यातील नदीकिनारी एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला होता. पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये या महिलेच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या होत्या ज्यातून या महिलेवर गँगरेप झाल्याचं उघड झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी बलात्कार आणि हत्या गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात केली. ही महिला कोण होती, तिच्यासोबत हे निर्दयी कृत्य करणारे नराधम कोण होते याची कुठलीही माहिती नव्हती तरीही या आव्हानात्मक गुन्ह्याचे कोडं सोडवण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे.
कंडरपूर पोलिसांनी क्राइम सीनवरून एक रक्ताने माखलेली पॅन्ट जप्त केली होती. त्या पॅन्टमध्ये न्यू स्टार टेलर्स नावाचा उल्लेख असणारी चिठ्ठी सापडली. ज्यावर गुजराती भाषेत एक नंबर लिहिला होता. ओरिसा पोलिसांनी ही चिठ्ठी त्यांच्या पोलिसांच्या ग्रुपवर व्हायरल करून टेलरला शोधण्याचा प्रयत्न केला परंतु टेलरबाबत माहिती सापडली नाही. त्याचवेळी पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष चिठ्ठीत असणाऱ्या गुजराती आकड्यांकडे गेले त्यानंतर कटकचे पोलीस आयुक्त जगमोहन मीणा यांनी गुजरातच्या ज्या शहरात ओरिसातील लोक राहतात तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांची मदत मागितली.
या प्रकरणी सूरतचे पोलीस आयुक्त अनुपम सिंह यांनी पीसीबी पोलीस निरीक्षक राजेश सुवेरा यांना तपासाचे आदेश दिले. अखेर सुवेरा यांच्या पथकाने न्यू स्टार टेलरचा शोध लावला. ही चिठ्ठी सूरत शहरातील लिंबायत परिसरातील एका टेलर दुकानदाराची होती. या चिठ्ठीत जे हस्ताक्षर होते ते टेलरने स्वत:चं असल्याची कबुली दिली त्यानंतर मेजरमेंट बुकचा तपास सुरू झाला. त्यात कार्बन कॉपीत चिठ्ठीतील तारीख सापडली. दुकानदाराकडे ग्राहकाचा पत्ता नसल्याने सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. त्यात दिवाळी आधी मित्रांसोबत कपडे शिवायला आलेला ओरिसातील एक व्यक्ती दिसून आला. या व्यक्तीसोबत असणाऱ्याने मित्राच्या मोबाईलवरून ऑनलाईन पैसे टेलरला दिले होते. याच व्यवहाराच्या मदतीने पोलीस त्या मित्राकडे पोहचली आणि कपडे शिवायला आलेला ओरिसातील जगन्नाथ उर्फ बापी सुनिया दुहेरी याचे नाव पुढे आले.
३ भावांनी केला महिलेवर गँगरेप अन् हत्या
जगन्नाथ सूरतच्या लिंबायत परिसरात लूम्स कारखान्यात काम करत होता. सूरत पोलिसांनी त्यांना मिळालेली माहिती कटक पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी जगन्नाथला पकडले आणि त्याला खाकीचा धाक दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. जगन्नाथ त्याचा मोठा भाऊ बलराम आणि चुलत भाऊ हापी यांनाही पोलिसांनी अटक केली. या तिघांनी मिळून महिलेवर गँगरेप केला होता त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह नदी किनारी फेकून पसार झाले. जगन्नाथने रक्ताने माखलेली त्याची पँन्ट मृतदेहाशेजारीच टाकून दिली. त्या पॅन्टमध्ये मिळालेली चिठ्ठी पोलिसांसाठी पुरावा ठरली आणि या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला.