ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर गुलालाची उधळण करीत येत घरासमोरून जाताना जातिवाचक घोषणाबाजी करून घरावर दगडफेक केल्याचा प्रकार बीड तालुक्यातील नांदूर हवेली येथे मंगळवारी सांयकाळी घडली. याप्रकरणी बीड ग्रामीण ठाण्यात शाहेद शेख यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
नांदूर हवेली येथील महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शेख शाहेद शेख मुजफ्फर, शेख आमेर अहेमद शेख अन्सार शेख रियाज शेख रज्जाक, शेख राजू शेख बाबू, शेख शाकेर शेख इसाक, गणेश बुधनर, शेख सिराज शेख रज्जाक पठाण रियाज अयूब व इतरांन घरासमोर येऊन गुलाल उधळत जातिवाचक घोषणा दिल्या. शेख शाहेद व इतरांनी महिलेच्या अंगावर गुलाल टाकून हात पकडला. त्यानंतर जीपसह वाहनांची तोडफोड केली.
कामखेड्यातही वाद-
बीड तालुक्यातील कामखेडा येथेही दोन गटांत वाद झाले. महिलांमध्ये बाचाबाची झाली. येथे ग्रामपंचायत निवडणुकीचेच कारण होते; परंतु येथे आगोदरच बीड ग्रामीण ठाण्याचे पोलीस कर्मचारी असल्याने वाद वाढला नाही. मात्र तरीही याठिकाणी दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते. गावात पोलिसांनी शक्ती प्रदर्शन केले. याच वादाच्या अनुषंगाने गावात लगेच शांतता समितीची बैठकही घेतल्याचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"