सागर दुबे, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: पाळधी येथील लग्न सोहळा आटोपून किनगाव जाण्यासाठी यावल बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी सुनिता मधुकर ठाकूर (रा.सिध्दीविनायक सोसायटी, सोनपाडा, नवी मुंबई) या प्रवासी महिलेच्या पर्समधील ६९ हजार रूपयांचे दागिने लांबविल्याची घटना मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानक येथे घडली.
याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबई येथे सुनिता ठाकूर या पती व मुलांसह वास्तव्यास आहे. त्यांचे सासर हे किनगाव (ता.यावल) येथील आहे. मंगळवारी त्या पती, जेठ व कुटूंबासह पाळधी येथे लग्न सोहळ्यानिमित्त आले होते. लग्न आटोपून मुळगावी अर्थात किनगाव येथे जाण्यासाठी ठाकूर या कुटूंब नवीन बसस्थान येथे दुपारी ४ वाजेच्या सुमारास आल्या. दरम्यान, यावल बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवून चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील दागिने चोरून नेले. बसमध्ये आल्यानंतर ठाकूर यांना त्यांची पर्सची चेन उघडी दिसली. त्यांनी त्यातील दागिने पाहिल्यानंतर ते दिसून आले नाही.
आजू-बाजूला शोध घेतला. पण, दागिने मिळून न आल्यामुळे ते चोरी झाल्याची खात्री झाली. अखेर ठाकूर यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार ६६ हजार रूपये किंमतीची सोन्याची मंगलपोत व ३ हजार रूपये किंमतीचा लक्ष्मीहार असा एकूण ६९ हजार रूपयांचे दागिने चोरून नेल्याची प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.