प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: उल्हासनगर, कल्याण पाठोपाठ डोंबिवलीतही ठाणे अन्न व औषध प्रशासनाने धाडसत्र सुरू केले आहे. सोमवारी केलेल्या कारवाईत गुटखा संबधित पानमसाला, सुगंधी तंबाखू, झाफराणी दर्जा अशा मनाई केलेल्या पदार्थांचा साठा आणि विक्री करणा-या पाच पान विक्री शॉप ला सील ठोकण्यात आले आहे. या पानटप-यांमधून एकुण १० हजार २८६ रूपयांचा माल जप्त केला आहे. यासंदर्भात मानपाडा पोलिस ठाण्यात संबंधित पान शॉप चालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चरस-गांजा, एमडी पावडर यासह गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू या अंमली पदार्थांना राज्यात बंदी असतानाही छुप्या पध्दतीने पान टप-या, तसेच पान शॉपमधून अशा पदार्थांची विक्री होत असल्याचे ठाणे अन्न व औषध प्रशासनाच्या उल्हासनगर आणि कल्याणमध्ये नुकत्याच झालेल्या कारवाईतून समोर आले आहे. दरम्यान सोमवारी अन्न सुरक्षा अधिकारी अर्चना वानरे आणि राजेंद्र करडक यांनी मानपाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक भानुदास काटकर, हेड कॉन्स्टेबल एस.डी ठिकेकर यांच्या सहकार्याने दुपारी दिड ते साडेतीन दरम्यान मानपाडा रोड, भारत पेट्रोल पंपाजवळील तसेच रूणवाल गार्डन परिसरातील मे. गणेश पान शॉप, मे.श्रीचंद पान शॉप, मे.नीरज पान शॉप, मे.टुरीस्ट पान शॉप, मे. अण्णा पान शॉप अशा पाच दुकानांवर धाडी टाकल्या आणि प्रतिबंधीत केलेला आणि तेथे आढळुन आलेला गुटखा संबंधित माल जप्त केला. संंबंधित पान विक्री शॉप चालकांनी हा माल कोठून खरेदी केला याची चौकशी मानपाडा पोलिस करीत आहेत.