मुंबईतील ड्रग्ज क्रूझ पार्टी प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या विरोधात सुरू केलेली आरोपांची मालिका अजूनही कायम आहे. नवाब मलिक यांनी आज आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित आणि सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या के पी गोसावी याचे एका अज्ञात व्यक्तीशी मोबाईलवर झालेले संभाषण ट्विट केले आहे. या संभाषणाच्या क्लिप्समुळे पुन्हा खळबळ माजण्याची शक्यता आहे.
याआधी नवाब मलिकांनी के पी गोसावींचे व्हॉट्सअॅप चॅट्स उघड केले आहेत. नवाब मलिकांच्या या नव्या खळबळजनक गौप्यस्फोटानं या प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांनी के पी गोसावी च्या ४ ऑडिओ क्लिप्स ट्विटरवरून पोस्ट केल्या आहेत.
पहिली क्लिप
के पी गोसावी - जस्ट कलेक्ट द डेटा अलोंग विथ कॉन्टॅक्ट डिटेल्स, इसके बाद में आपण मोबाईल से ही ट्रेस करलेंगे! कोई दिक्कत नाही हैं. बट डोन्ट डिस्कस अपार्ट फ्रॉम मी बिकॉज आय एम डायरेक्टली टू द ऑफिशियल
दुसरी क्लिप
के पी गोसावी - कबीर का.... कबीर के पास कन्फर्म होगा क्या! मुझे कन्फर्म जिनके पास होगा १० मे से ५ तोभी कन्फर्म चाहिए आ, उनके पास निकलना चाहिए.
तिसरी क्लिप
के पी गोसावी - दादा! दिल्ली का मेसेज डालना है तो अभी डाल दो हां! बाद मे दिल्ली बंद हो जायेगा फार कल तक चला जायेगा.
चौथी क्लिप
के पी गोसावी - भाई जाने दे अभी सब लोक थक गये हैं! पुरा स्टाफ थक गया हैं और मै भी कल से सोया नाही हूं! मेरी भी हालत खराब हैं एव्हरीबडी इज टायर्ड
मुंबईतील समुद्रात आयोजित क्रूझ पार्टीवर कारवाई करण्यासंदर्भातील काही चॅट्स आणि ऑडिओ क्लिप नवाब मलिक यांनी उघड केले आहेत. यातील एका ऑडिओ क्लिपमध्ये के पी गोसावी हा ऑफिशियल असा उल्लेख करत असल्याचं समोर आलं आहे. क्रूझवरील पार्टीत ठराविक व्यक्तींनाच टार्गेट करण्यासंदर्भात के पी गोसावी एका व्यक्तीसोबत चॅट्सवर बोलत असल्याचं दिसून येत आहे. "केपी गोसावी आणि माहिती देणारा व्यक्ती कॉर्डिलिया क्रूझवरील पार्टीत ठराविक लोकांना अडकवण्यासाठीचं प्लानिंग करत असल्याचं या व्हॉट्सअॅप चॅटमधून उघड होत आहे. तर के पी गोसावी हा एनसीबी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं अज्ञात व्यक्तीला सांगत असल्याचं ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट होत आहे. या ४ ऑडिओ क्लिपबाबत नवाब मलिक यांनी माहिती देत के पी गोसावीचे हे संभाषण असल्याचं नमूद केले आहे.