अमेरिकेमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका व्यक्तीला त्याच्या पत्नीची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांना त्या व्यक्तीच्या गुगल सर्चवरून संशय आला कारण तो पत्नी गायब झाल्यानंतर काही दिवसांनी इंटरनेटवर पुन्हा लग्न करण्याचा मार्ग शोधत होता. मिळालेल्या माहितीनुसार, ३३ वर्षीय नरेश भट्टवर त्याची २८ वर्षीय पत्नी ममता भट्टची हत्या केल्याचा आरोप आहे.
नरेशने गुगलवर 'तुमच्या जोडीदाराच्या मृत्यूनंतर तुम्ही किती दिवसांनी पुन्हा लग्न करू शकता?' असं सर्च केलं होतं. त्यानंतर पोलिसांना त्याच्यावर संशय आला. इतकंच नाही तर नरेशने वॉलमार्टकडून अनेक संशयास्पद वस्तू खरेदी केल्या होत्या, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. CNN च्या रिपोर्टनुसार, कोर्टाच्या रेकॉर्डवरून असं दिसून आलं आहे की, नरेश भट्टवर प्रिन्स विल्यम काउंटी सर्किट कोर्टात दोन गुन्हे दाखल आहेत. त्याची पत्नी ममताला शेवटचं २९ जुलै रोजी पाहिलं गेलं होतं, मात्र तिचा मृतदेह सापडला नाही.
व्हर्जिनिया ग्रँड ज्युरीने ममता बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांत संशयास्पद वस्तूंची खरेदी आणि ऑनलाइन शोधांच्या आधारे नरेशवर हत्येचा आरोप केला आहे. ५ ऑगस्ट रोजी ममता बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली गेली, त्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांना नरेशचीही चौकशी करावी लागली. नरेश भट्टवर हत्येच्या आरोपाशिवाय मृतदेह लपवल्याचाही आरोप आहे. या आरोपांना उत्तर देण्यासाठी त्याला न्यायालयात हजर राहावं लागणार आहे.
चौकशीदरम्यान ममताचा पती नरेश भट्टने पोलिसांना सांगितलं की, दोघांमध्ये मतभेद होते आणि ते वेगळे होण्याचा विचार करत होते. सरकारी वकिलांनी एप्रिलमध्ये नरेशवर आरोप केला आहे. तसेच स्थानिक वॉलमार्टकडून तीन चाकू खरेदी केले, त्यापैकी दोन अद्याप सापडलेले नाहीत. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वॉलमार्टकडून साफसफाईचे सामान खरेदी करताना तो सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला होता.