कोरडगाव : पाथर्डी तालुक्यातील भुतेटाकळी येथे दोन ते तीन महिन्यांपूर्वी चोरी केेलेल्या ठिकाणीच पुन्हा भरदिवसा चोरी करण्यास आलेल्या चोरट्याला ग्रामस्थांनी पकडले. ही घटना रविवारी (दि. ३०) दुपारी घडली. यावेळी इतर दोघे पळून गेले.
भुतेटाकळी येथील तुकाराम नाथा फुंदे यांच्या घरी भरदिवसा चोरी करून मोठा ऐवज लंपास करण्याची घटना दोन-तीन महिन्यांपूर्वी घडली होती. याचठिकाणी रविवारी दुपारी पुन्हा त्यांच्याच घरात चोरी करण्याचा प्रकार घडला. मात्र, शेतात काम करत असलेल्या तुकाराम फुंदे यांना फोन आल्यानंतर या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घराकडे जाऊन पाहिले. यावेळी त्यांनी चोराला पकडले. परंतु, त्यातील एकजणच त्यांच्या हाती लागला. इतर दोघे पळून गेले. या घटनेची माहिती पाथर्डी पोलिसांना कळविली असता, पोलीस कर्मचाऱ्यांनी एका चोरट्याला ताब्यात घेतले.
पाथर्डीच्या पूर्व भागात भरदिवसा चोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. शेतकरी शेतात कामाला गेल्याचा फायदा उठवत चोरी करणाऱ्यांसाठी रात्रीऐवजी दिवसा चोरी करण्याचा नवीन फंडा चोरांनी अवलंबल्याचे दिसून येत आहे. पूर्व भागामध्ये बैल, शेळ्या, विद्युत पंप, सौरऊर्जा पंप आदी चोरीच्या घटना घडल्या आहेत. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सोमीनाथ बांगर करत आहेत.