मुंबई - मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयाच्या आत लावलेल्या संरक्षण जाळीवर महिलेची उडी घेतली. त्यामुळे महिलेचा जीव वाचला आहे. उल्हासनगर येथील ही महिला असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून मंत्रालयात तैनात पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे. सध्या महिलेला मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून ही महिला काही कामानिमित्त मंत्रालयात गेले अनेक दिवस येरझऱ्या घालत होती. त्यामुळे त्रस्त होऊन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. याआधी देखील अनेकदा मंत्रालयात असे आत्महत्येचे प्रयत्न केलेल्या घटना घडल्या. मात्र, सरंक्षण जाळीमुळे त्यांचे देखील प्राण वाचले.
प्रियंका गुप्ता असं या महिलेचं नाव आहे. या महिलेने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली आहे. गेले अनेक दिवस वैद्यकीय सहाय्यता निधी मिळत नसल्याने ही महिला त्रस्त होती. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ही महिला मंत्रालयात येरझऱ्या घालत होती अशी प्रथमिक माहिती आता समोर येते आहे. मात्र, या घटनेबाबत अधिक माहिती मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृत्युंजय हिरेमठ यांना विचारली असता नेमके या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न का केला आणि महिलेचे नाव समजू शकलेले नाही असे सांगण्यात आले.