बुलढाणा - वेगवेगळ्या प्रलोभनासाठी अंधविश्वास ठेवून अनेकजण अघोरी पुजा आणि पशूबळी, नरबळी देण्याच्या घटना जन्माला घालतात. कधी पैशाच्या मोहापायी, तर कधी मुलगाच व्हावा या हट्टापायी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यात येते. त्यासाठी, कधी घरात, कधी स्मशानात जाऊन मांत्रिकाच्या सल्ल्यानुसार विधी केला जातो. खामगाव तालुक्याच्या पारखेड गावातील नागरिकही अशाच स्मशानातील अघोरी पुजेमूळे तणावात आणि भीतीपूर्ण वातावरणात आहेत. मात्र, आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांना दिलासा दिला आहे.
येथील गावच्या स्मशानभूमीत मध्यरात्री कुणीतरी अज्ञात लोकांनी अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सकाळी गावातील काही महिलांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. स्मशानात हळद-कुंकूची रांगोळी मांडून केलेल्या पुजेमुळे गावात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पारखेडच्या स्मशानभूमीत कुणीतरी अज्ञात लोकांनी ही अघोरी पूजा केली आहे. स्मशानभूमीत वेगवेगळ्या ठिकाणी लिंबू ठेवले असून त्या लिंबात सुया टोचल्या आहेत. याशिवाय लिंबाच्या भोवती रांगोळीचे, तांदळाचे गोल रिंगण करण्यात आले होते. संपूर्ण स्मशानभूमीत ठेवलेल्या लिंबाभोवती हळदी कुंकुचे रिंगण करण्यात आल्याचे दिसून आले.
दरम्यान, हा काळ्या जादूचा किंवा गुप्तधनाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर काहींच्या मते हा गुप्तधनासाठी बळी देण्याची प्रक्रिया असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ही अघोरी पूजा केली कुणी?, याबाबत अद्याप कोणतीही माहितीसमोर आली नाही. मात्र, पारखेड ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. याप्रकरणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे किशोर वाघ यांनी दखल घेत पोलिसांना पाचारण केले. तसेच, या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची मागणीही वाघ यांनी केली आहे. कारण, हे कृत्य शासनाच्या जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा असल्याचे वाघ यांनी सांगितले.