मुंबई - शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. याविरोधात राज्यभर राष्ट्रावादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. तर बारामतीत बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबईतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ईडीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी ईडी की दादागिरी नही चलेगी’, ‘सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है अशी घोषणाबाजी केली. मात्र, पोलिसांनी हे आंदोलन गुंडाळलं. पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर लाठीचार्ज करत काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. मागील तीन वर्षे यासंदर्भातल्या काहीही घडामोडी घडलेल्या नव्हत्या. मात्र विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शरद पवार, अजित पवार यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी एकूण ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.