केंद्र सरकारने सैन्यात भरतीसाठी अग्निपथ ही योजना जारी केली आहे. यावरून बिहार, युपीसह पाच राज्यांमध्ये तरुणांनी हिंसक आंदोलन सुरु केले आहे. काही रेल्वे जाळण्यात आल्या आहेत. याचदरम्यान सैन्यात भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या एका हरियाणाच्या तरुणाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. यावर त्याच्या वडिलांची प्रतिक्रिया आली आहे.
सचिन असे या तरुणाचे नाव होते. त्याचे वडील सैन्यातून निवृत्त झाले आहेत. त्यांचा मोठा मुलगा बेरोजगार आहे. यामुळे सचिनला सैन्यात भरती होऊन कुटुंबाचा गाडा चालवायचा होता. त्याची बहीण पूनमने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याच्या डोक्यात सैन्यात जाण्याचेच फिट बसले होते. यामुळे तो घरापासून लांब राहून गेल्या दोन वर्षांपासून सैन्यात भरती होण्याची तयारी करत होता.
सचिनच्या हॉस्टेल रुममध्ये राहणाऱ्या तरुणाला त्याने बर्थडे पार्टीला जात असल्याचे सांगून दुसऱ्या रुममध्ये झोपण्यास सांगितले होते. सचिनने रात्री उशिरा आपले काही मित्र येतील असेही सांगितले होते. गुरुवारी जेव्हा दरवाजा उघडला नाही तेव्हा तो तोडण्यात आला.
सचिनचे वडील सत्यपाल यांनी सांगितले की, सैन्यात जाण्यासाठी तो खूप प्रयत्न करत होता. कोणत्याही प्रकारच्या निर्णयांनी तरुण जर घाबरत असतील ते सैन्यात जाण्याच्या लायक नाहीत. तरुणांनी धीर ठेवण्याची गरज आहे. कुटुंबीयांच्या हिताचा निर्णय घेऊन तरुणांनी निर्णय घ्यावेत, कुटुंबाला पुढे त्रास होऊ नये. माझ्या मुलाची वेळ आली होती, यामध्ये कोणाचा दोष नाही.