आग्रा येथे एका वकिलाने स्वतःच्याच किडनॅपिंगची केस कोर्टात दाखल केली, न्यायाधीशासमोर युक्तिवाद केला आणि शेवटी दोषींना शिक्षा झाल्याची घटना समोर आली आहे. न्यायालयाने १७ वर्षे जुन्या किडनॅपिंग प्रकरणात निकाल देताना ८ गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयात अंतिम युक्तिवाद सुरू असताना कुख्यात दरोडेखोर गुड्डन काछी याच्यासह ८ गुन्हेगारांना शिक्षा सुनावण्यात आल्याने कुटुंबीयांना मोठा आनंद झाला आहे.
१० जानेवारी २००७ रोजीची ही घटना आहे. जेव्हा अविनाश गर्ग, रवी गर्ग हे खेरागड शहरातील मेडिकल स्टोअरमध्ये बसले होते आणि त्यांचा ७ वर्षांचा मुलगा हर्ष देखील तिथे होता. त्यानंतर कुख्यात दरोडेखोर गुड्डन काछी त्याच्या साथीदारांसह मेडिकल स्टोअरमध्ये पोहोचला आणि त्याने बंदुकीच्या जोरावर ७ वर्षीय हर्षचं अपहरण केलं. वडील रवी गर्ग यांनी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. यामध्ये ते जखमी झाले.
१४ जणांविरोधात गुन्हा दाखल
७ वर्षीय हर्षच्या अपहरणानंतर पोलिसांनी गुड्डन काछीसह १४ गुन्हेगारांवर गुन्हा दाखल केला. आग्रा पोलीस आणि मध्य प्रदेश पोलिसांनी हर्षचा शोध घेण्यासाठी संयुक्त मोहीम सुरू केली आणि लोकेशन बदलण्यासाठी गुन्हेगार त्याला स्कूटरवरून मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे घेऊन जात होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्हेगारांना घेरलं आणि हर्षची सुटका केली.
"मी स्वतः वकील बनून माझी केस लढू शकतो"
वकील हर्ष गर्गने दिलेल्या माहितीनुसार, २०१४ ते २०१८ पर्यंत केस सुरू होती. यावेळी मी न्यायालयाचे संपूर्ण कामकाज पाहत असे, वडीलही वकील होते. मी वकिलांना कोर्टात वाद घालताना पाहायचो आणि मग विचार आला की मी स्वतः वकील बनून माझी केस लढू शकतो. हर्ष गर्गने २०२२ मध्ये आग्रा कॉलेजमधून शिक्षण घेतलं आणि मग गुन्हेगारांना शिक्षा देण्याचा प्रवास सुरू झाला.
स्वत:च लढली केस आणि गुन्हेगारांना दिली शिक्षा
वकील बनून हर्ष गर्गने स्वतः कोर्टात केस लढवली आणि गुड्डन काछीसह ८ जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली. १७ सप्टेंबर रोजी न्यायालयाचा निर्णय आला. विशेष न्यायाधीशांनी अपहरण प्रकरणात गुड्डन काछी, राजकुमार काछी, फतेह सिंह, अमर सिंह, भीकम सिंह, राम प्रकाश, बलवीर आणि राजेश यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मुलाची मेहनत आणि यश पाहून कुटुंबीयांना फार आनंद झाला आहे.