उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एक 45 वर्षीय व्यक्ती 14 वर्षीय मुलीच्या प्रेमात पडला. धक्कादायक बाब म्हणजे मुलगी त्याच्याशी बोलली नाही म्हणून त्याने तिला उडवण्यासाठी यूट्यूबवर पाहून बॉम्ब बनवला आणि दुकानाजवळ ठेवला. पोलिसांना माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी पोहोचले. आजूबाजूचा परिसर तातडीने रिकामा करण्यात आला.
बॉम्बशोधक पथकाने सुमारे 2 तास तपास करून बॉम्ब ताब्यात घेतला. यानंतर बॉम्ब सुरक्षित ठिकाणी नेऊन निकामी करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, जगदीशपुरा पोलीस स्टेशनच्या वायु विहार परिसरात ही भयंकर घटना घडली. पेट्रोल पंपाजवळ मुलीचं आणि तिच्या आईचं एक छोटंस दुकान आहे. तिथे त्या विडी, सिगारेट, तंबाखू इत्यादींची विक्री करतात.
मुलीने दिलेल्या माहितीनुसार, 18 मार्चला सकाळी दुकानाखाली बॉम्ब असल्याचं तिला समजलं. तिला एका खोक्याजवळून धूर निघत असल्याचं दिसलं. तिने ते चेक केलं असताना बॉम्बसारखं काहीतरी पाहिलं, त्यादिवशी घरी कोणीच नव्हतं, त्यामुळे ती घटनेबद्दल कोणालाही सांगू शकली नाही. यानंतर 19 मार्चला सकाळी आई आणि भावाला तिने याविषयी माहिती दिली.
भावाने 112 वर फोन करून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. जवळपासचे रस्ते अडवण्यात आले. बॉम्ब निकामी पथकाने तपास केला असता तेथे संगमरवरी बॉक्स असून त्यातून तारा बाहेर येत असल्याचे आढळून आले. पथकाने संगमरवरी बॉक्स बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेला.
डीसीपी सिटी सूरज कुमार राय यांनी सांगितलं की, 112 क्रमांकावर माहिती मिळाली की एक बॉम्ब ठेवण्यात आला आहे. जगदीशपुरा पोलीस, एसीपी लोहमंडी आणि बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी पोहोचले. ज्या संशयास्पद वस्तूला बॉम्ब म्हटले जात होते त्याची तपासणी करण्यात आली. सुरक्षित ठिकाणी नेऊन तो निकामी करण्यात आला.
पोलिसांनी आजूबाजूचे कॅमेरे तपासले. बॉम्ब ठेवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, गयाप्रसाद अस त्याचं नाव आहे. मुलीच्या कुटुंबाशी त्याची ओळख आहे. मुलीच्या तो प्रेमात पडला होता. पण तिने बोलण्यास नकार दिल्यानंतर त्याने हा धक्कादायक कट रचल्याचं सांगितलं. जगदीशपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कारवाई करत आहेत.