आग्रा : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) आग्रा पोलिसांनी (Agra police) चेन स्नॅचिंगच्या आरोपाखाली एका कंपनीच्या एचआरला अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने प्रेयसीला महागड्या भेटवस्तू देण्यासाठी चेन स्नॅचिंगसारख्या घटना घडवून आणल्याचे समोर आले आहे. अभिषेक ओझा असे आरोपीचे नाव आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी खूप शिकलेला आहे. तसेच, तो गुरुग्राममधील एका कंपनीत एचआर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. हा आरोपी दुचाकीवरून चेन स्नॅचिंग करत होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांत आग्रामध्ये चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्या होत्या. गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिस रस्त्यांवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन करत होते. यामधील एका फुटेजमध्ये आरोपी दिसला होता.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीच्या घरी पोहोचले, तेव्हा सुरुवातीला त्याने घटनेचा इन्कार केला. उलट पोलिस अधिकार्यांसमोर तो इंग्रजीत बोलत होता. मात्र, यानंतर पोलिसांनी आरोपीला सीसीटीव्ही फुटेज दाखवले असता त्याने स्नॅचिंगच्या घटनेची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे यापूर्वी कोणतेही गुन्हे नोंद नाहीत.
याचबरोबर, आरोपीने आग्रा पोलिसांना सांगितले की, कोरोनामुळे त्याचे काम अजूनही घरातून काम म्हणून सुरू आहे. कामातून मोकळा झाल्यावर तो बाईकवर आग्राच्या रस्त्यांवर फिरत होता आणि चेन स्नॅचिंग करत होता. तसेच, तो अनेकदा महिलांना टार्गेट करत होता. तो महिलांकडील दागिने हिसकावून सोनारांना विकत होता. या दागिन्यांसाठी तो सोनाराकडून भरमसाठ रक्कम घेत होता.
आरोपींकडून जप्त केले पिस्तूल पोलिसांनी आरोपींकडून दुचाकी, सोनसाखळी, पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली आहेत. आरोपी लोकांना बंदुकीचा धाक दाखवून लुटत होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी हा उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. त्यांचा पगारही जवळपास 45000 रुपये आहे. आपल्या मैत्रिणीसाठी आणि मौजमजेसाठी तो चेन स्नॅचिंग करत होता.चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, 8 नोव्हेंबर 2022 रोजी त्याने आग्रा शहरातील एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लुटली होती. याशिवाय, चेन स्नॅचिंगच्या अनेक घटनांमध्येही आरोपीचा सहभाग होता.