सोलापूर : ज्ञात उत्पन्नाच्या १७.१४ टक्के म्हणजे १४ लाख ९३ हजार ८१७ रुपयांची संपती भ्रष्ट मार्गाने मिळवल्याचा ठपका ठेवत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी करुन कृषी सहाय्यक व सहाय्य केल्याबद्दल पत्नी विरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने बुधवारी गुन्हा नोंदला आहे.
काशीनाथ यल्लप्पा भजनावळे (कृषी सहाय्यक, वय ५०), पत्नी किशोरी काशिनाथ भजनावळे (वय- ४५, दोघे रा. सिद्धापूर, ता. पंढरपूर) अशी गुन्हा नोंदलेल्या दोघांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी दिलेल्या अधिकृत पत्रात म्हटले आहे की, कृषी सहाय्यक भजनावळे यांनी भ्रष्ट मार्गाने त्यांचे व त्यांच्या पत्नीच्या नावाने संपादित केलेली अपसंपदा रक्कम १४ लाख ९३ हजार ८१७ इ!की आहे.
लोकसेवक व त्यांच्या पत्नीच्या ज्ञात उत्पन्नाची एकत्रित टक्केवारी काढता ती १७.१४ आहे. सदरची संपत्ती अपसंपदा आहे याची जाणीव असूनही लोकसेवकाच्या पत्नीने त्यास सहाय्यक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमनाद्वारे गुन्हा नोंदला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी पार पाडली.
चौकशीतून निष्पन्नलोकसेवकाकडून सदरची अपसंपदा ही मार्च १९९५ ते जुलै २०१४ या कालावधीत मिळवलेली आहे. यासाठी तत्कालिन चौकशी अधिकारी पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, चंद्रकांत कोळी, विद्यमान पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी केलेल्या चौकशीतून समोर आल्याचे म्हटले आहे.