लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कृषी मालाच्या निर्यातीसाठी आवश्यक प्रमाणपत्र देण्यासाठी लाच स्वीकारत असल्याच्या आरोपावरून एका कृषी अधिकाऱ्याला सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयने विशाखापट्टणम येथे ही कारवाई केली आहे. याप्रकरणी सीबीआयने या अधिकाऱ्याच्या घरी केलेल्या छापेमारीदरम्यान १ कोटी ८६ लाख रुपये आणि काही कागदपत्रे जप्त केली आहेत. या अधिकाऱ्यासोबत मध्यस्थी करणाऱ्या अन्य तीन व्यक्तींनाही अटक करण्यात आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, झाडांची रोपे, तसेच अन्य कृषी माल बोटीद्वारे परदेशात पाठविण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे एक प्रमाणपत्र देण्यात येते. मालाच्या गुणवत्तेसंदर्भात हे प्रमाणपत्र जारी केले जाते. कृषी मंत्रालयाच्या विशाखापट्टणम येथील विभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या आर. पद्म सिंग या अधिकाऱ्याकडे हे प्रमाणपत्र जारी करण्याचा कार्यभार होता.
कृषी मालाच्या गुणवत्तेशी संबंधित असे हे प्रमाणपत्र असते. मात्र, हे प्रमाणपत्र जारी करण्यासाठी हा अधिकारी मोठ्या प्रमाणावर लाचखोरी करत असल्याची माहिती सीबीआयला प्राप्त झाली. दरम्यान, एका खासगी कंपनीच्या अधिकाऱ्याकडून सहा हजार रुपयांची लाच घेताना पद्मसिंग याला अटक करण्यात आली. पद्मसिंग याची विशाखापट्टणम येथे तीन घरे असून, या तीनही घरांवर सीबीआयने शनिवारी छापेमारी केली. यापैकी एका घरातून १ कोटी २९ लाख रुपयांची रोकड सीबीआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली. तर दुसऱ्या घरातून ५६ लाख रुपयांची रोकड सीबीआयने जप्त केली.