कोपरगाव (जि. अहमदनगर) : तालुक्यातील आंचलगाव शिवारात शेततळ्यावर पाणी आणण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे.
या संदर्भात पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले असल्याची माहिती कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आज दिली आहे. या घटनेने आंचलगावात शोककळा पसरली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आंचलगाव परिसरातील रहिवाशी पूजा निलेश शिंदे (वय २२) आणि निलेश रावसाहेब शिंदे (वय २७) असे मृत्यु झालेल्या पती पत्नीचे नाव आहे.
मयत निलेश हा उच्च शिक्षित असून, वर्षभरापूर्वीच त्याचा पूजा हिच्याशी विवाह झाला होता. मंगळवार रोजी वीज नसल्याने पूजा निलेश शिंदे व तिचा पती निलेश हे जनावरांना पाणी आणण्यासाठी शेततळ्यावर गेले होते. पाणी भरत असताना निलेश यांचा पाय शेततळ्याच्या कागदावरून घसरून ते शेततळ्यात पडले. आपल्या पतीला वाचवण्यासाठी पत्नी पुजाने पाण्यात उडी मारली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे.या संदर्भात तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले व त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने तळ्यातील पाणी कमी करून दोघांना शेततळ्याबाहेर काढून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.