अहमदनगर : येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात युवकांने खोटा गुन्हा दाखल केला आहे, असे म्हणत अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान न्यायालय आवारात नियुक्तीस असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी आग विझवित युवकाला ताब्यात घेतले असून, त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.ऋषिकेश विठ्ठल ढवण (रा. बाभूळगाव, ता. राहुरी), असे या युवकाचे नाव आहे.
येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात ढवण हा साडेअकरा वाजेच्या सुमारास एका झाडाखाली बसलेला होता. तो अचानक उठला आणि माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे , असे म्हणत त्याने बाटलीतून आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतले. स्वतःला पेटून घेतल्याने आग भडकली. तो सैरभैर पळू लागला. ही बाब तेथे नियुक्त असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन माती टाकून आग विझवली, तोपर्यंत ही व्यक्ती मोठ्या प्रमाणात जळालेली होती.
पोलिसांनी तातडीने रुग्णालयाशी संपर्क करून रुग्णवाहिका बोलावून घेतली. रुग्णवाहिकेतून संबंधित युवकाला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आत्मदहन करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. परंतु सदर व्यक्ती ही राहुरी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असल्याने तिथे गुन्हा दाखल असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.