लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सायबर गुन्हेगारांवर रोख आणण्यासाठी आता राज्याच्या सायबर विभाग कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) वापर करत आहे. विभागाने एआय कक्ष स्थापन करत, सायबर भामट्यांची ओळख, फसवणुकीसाठी अवलंबण्यात येणारी नवी कार्यपद्धती एका क्लिकवर पोलिसांना उपलब्ध होणार आहे. दुसरीकडे, गेल्या साडेतीन वर्षांत २ लाख ८१ हजार तक्रारी आल्या असून, त्यांचे ३५८.७७ कोटी वाचविण्यात राज्य सायबर विभागाला यश आले. विशेष पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव आणि संजय शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज सुरू आहे.
सायबर महाराष्ट्रने दिलेल्या माहितीनुसार, सायबर विभागाच्या १९३० हेल्पलाइनवर रोज चार ते पाच हजार कॉल येत आहेत. त्याची दखल घेत कारवाई करण्यात येत आहे. २०२१ पासून दि. २६ जुलै २०२४ पर्यंत २ लाख ८१ हजार १९ तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये ३ हजार ३२४ कोटींची फसवणूक झाली. फसवणूक झालेल्या रकमेपैकी ३५८.७७ कोटी वाचविण्यात सायबर विभागाला यश आले. दुसरीकडे सायबर गुन्हेगारांवर रोख आणण्यासाठी ‘एआय’ मदतीने कारवाईसाठी सज्ज आहे.
...अन् बँकेचे ३३ कोटी वाचले बँकेच्या एका खात्यातून ४० कोटींची रक्कम एका संशयित खात्यात ट्रान्सफर झाली होती. बँकेने दि. १९ जुलैला सायबर महाराष्ट्रकडे तक्रार केली होती. बँकेच्या हैदराबाद शाखेच्या व्यवस्थापकाने ४० कोटींची रक्कम मुंबई शाखेत ट्रान्सफर केली. पुढे ही रक्कम अन्य खात्यांमध्ये फिरविण्यास सुरुवात करत, त्यातील ४.५ कोटी रुपये त्याने स्वतः काढून घेतले. मुंबई शाखेतील अधिकाऱ्यांना या व्यवहारांची शंका वाटल्याने त्यांनी सायबर महाराष्ट्राकडे ऑनलाइन तक्रार केली. विभागातील अधिकाऱ्यांनी वेळीच हालचाली करून यातील ३२ कोटी ९० लाख रुपये गोठविण्यास सायबर पोलिसांना यश आले आहे.