नवी दिल्ली : चिथावणीखोर वक्तव्यं आणि सोशल मीडियावर द्वेष पसरवणारे मेसेज केल्याप्रकरणी दिल्लीपोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्याविरोधात एफआयआर (FIR) नोंदवल्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाला पोलिसांनी दणका दिला आहे. गुरुवारी नवी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनबाहेर निदर्शनं आणि घोषणाबाजी केल्यानंतर पोलिसांनी ३० कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी भादं वि (IPC) कलम १८६, १८८, ३५३, ३३२, १४७, १४९ आणि ३४ अन्वये अटकेची कारवाई केली आहे. नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ हे कार्यकर्ते पोलीस ठाण्याबाहेर जमले आणि त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. दिल्लीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भडकावू वक्तव्ये करून समाजातील वातावरण बिघडवणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे. नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्यासह नऊ जणांवर कारवाई केल्यानंतर आता असदुद्दीन ओवेसी आणि स्वामी नरसिंहानंद यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात द्वेषयुक्त मेसेज पसरवणे, खोट्या बातम्या पसरवणे, धार्मिक सलोखा बिघडवणे आणि इतर अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
विशेष सेलच्या 'इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन' (IFSO) युनिटने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्यासह नऊ जणांची नावे आहेत, असे पोलिसांनी सांगितले.