मुंबई - तारीख २५ नोव्हेंबर, शहरातील अंधेरी परिसर..रात्रीची वेळ होती, एअर इंडियाची महिला पायलट सृष्टी तुलीने तिचा मित्र आदित्य पंडितला फोन लावला. आदित्यने फोन उचलताच तिने मी सुसाईड करत आहे, आता मी तुला कधी त्रास देणार नाही असं सांगितले. सृष्टीचे हे बोलणं ऐकताच आदित्य घाबरला तो पुढे काही बोलणार इतक्यात सृष्टीने फोन ठेवून दिला. आदित्य वेळ न घालवता सृष्टीच्या घराच्या दिशेने निघाला परंतु तिथे पोहचताच दरवाजा आतून बंद होता. एका चावीवाल्याच्या मदतीने आदित्यने सृष्टीच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि आत जाताच त्याला सृष्टीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला. डेटा केबलच्या सहाय्याने सृष्टीने गळफास घेतला होता हे दृश्य पाहून आदित्यला घाम फुटला. त्याने ही माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले त्यांनी सृष्टीचा मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवला. त्यानंतर तिच्या घरच्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर तपासात जे काही उघड झाले त्याने सगळ्यांना धक्का बसला.
सृष्टीच्या घरच्यांनी आदित्यवर आरोप केले. मागील २ वर्षापासून आदित्य आमच्या मुलीला त्रास देत होता. हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते तरीही तो सृष्टीचा छळ करायचा. सृष्टी मानसिक तणावाखाली गेली होती. सृष्टी तुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी २६ नोव्हेंबरला आरोपी आदित्यला अटक केली. त्यानंतर बुधवारी त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला कोर्टासमोर हजर केले असता त्याला २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांना फ्लॅटमधून कुठलीही सुसाईड नोट आढळली नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, आदित्य हा सृष्टीला मानसिक त्रास द्यायचा. तो सृष्टीला आयुष्यभर त्याच्यासोबत राहण्यासाठी, खाण्या पिण्यावरून अनेकदा दबाव बनवत होता. २ वर्ष आदित्य आणि सृष्टी रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांमध्ये वाद व्हायचे. यावेळी आदित्यने १२ दिवस सृष्टीला व्हॉट्सअपवर ब्लॉक करून ठेवले. त्यानंतर १३ व्या दिवशी सृष्टीने आदित्यला फोन करून ती जीव देतेय असं सांगून आत्महत्या केली. आदित्य सृष्टीसोबत प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण करायचा. एकदा हे दोघे शॉपिंगला गेले होते. त्याठिकाणी दोघांमध्ये वाद झाला तेव्हा त्यांच्या कारचा अपघात झाला होता. त्या रागात आदित्यने सृष्टीला कारमधून खाली उतरवलं आणि तिथून निघून गेला.
रात्रीच्या वेळी सृष्टी एकटी त्या रस्त्यावर होती. तिने एका मित्राची मदत मागितली त्यानंतर ती सुखरूप घरी पोहचली. या घटनेनंतरही सृष्टीने आदित्यला माफ केले आणि रिलेशनशिप कायम ठेवले. एकदा दोघे रेस्टॉरंटला गेले होते. तिथे जेवणाची ऑर्डर दिली. आदित्य वेजिटेरियन होता तर सृष्टी नॉनवेजही खायची. सृष्टीने नॉनवेज ऑर्डर केले म्हणून आदित्यला राग आला. त्याने तिला सगळ्यांसमोर सुनावले. सृष्टीने आदित्यच्या या वागण्याकडे फारसं लक्ष दिले नाही ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करायची. एक दिवस आदित्य सुधारेल अशी आशा तिला होती. सृष्टीने फक्त त्याचेच ऐकावे असं आदित्यला वाटायचे. तो बोलेल ते करायचे, तिच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम आदित्य करायचा असा त्याच्यावर आरोप आहे. सृष्टीला अनेकदा तिच्या घरच्यांनी आणि मित्रमंडळींनी समजावलं होते परंतु प्रेमापोटी तिने कुणाचेही ऐकले नाही. सहन करण्याची एखादी मर्यादा असते मात्र सृष्टीने प्रेमासमोर ते सर्व सहन केले. यावेळीही तेच झाले. आदित्यच्या बहिणीचं लग्न होते, सृष्टीला काही कारणास्तव तिच्या लग्नात जाता आलं नाही. तिने लग्नाला यावं यासाठी आदित्य सृष्टीच्या मागे लागला होता, ती लग्नाला आली नाही म्हणून आदित्यने रागात सृष्टीला व्हॉट्सअपवर ब्लॉक करून टाकले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सृष्टी आदित्यची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती. मात्र त्याने ब्लॉक केल्याने जास्त संवाद झाला नाही. अखेर १२ व्या दिवसानंतर आदित्यने सृष्टीचा नंबर ब्लॉक लिस्टमधून काढला तेव्हा तिने आदित्यला अखेरचा कॉल केला. मी सुसाईड करत आहे. आता माझा त्रास तुला होणार नाही असं सांगत तिने मृत्यूला कवटाळलं. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी काही लोकांची पोलीस चौकशी करत आहेत.