एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये महिला प्रवाशावर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्राला अटक करण्यात आली आहे. शंकरला बंगळुरूमधून अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी मुंबईत येत राज्यभर छापेमारी केली होती. परंतू शंकर त्यांना सापडला नव्हता. अखेर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे बंगळुरूमध्ये छापा टाकण्यात आला.
दिल्ली पोलीस आता या शंकरला दिल्लीला नेणार आहेत. शंकर मिश्रावर २४ दिवसांनी कारवाई झाली आहे. तोच महाभाग असल्याचे समोर आल्यानंतर वेल्स फार्गो कंपनीने त्याला कामावरून काढून टाकले होते. शंकर मिश्रा या कंपनीचा भारतातील उपाध्यक्ष होता. तीन दिवसांपूर्वीच त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती.
शंकर मिश्रा हा २६ नोव्हेंबरला बिझनेस क्लासमधून प्रवास करत होता. एअर इंडियाच्या या फ्लाइटमध्ये त्याने एका वृद्ध महिलेवर लघवी केली. शंकर मिश्राने खूप मद्य प्राशन केले होते आणि दारूच्या नशेत होता. गेल्याच आठवड्यात या महिलेने कारवाई न झाल्याचे पाहून टाटा ग्रुपच्या अध्यक्षांना पत्र लिहीले होते. यानंतर कारवाईस सुरुवात झाली होती. एअर इंडियाच्या क्रूने हे प्रकरण दाबले होते.
महिलेने टाटा समूहाला पत्र लिहिलेटाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अनेक दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे पीडित महिलेने थेट टाटा समूहाचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांना पत्र लिहिले. त्या महिलेने पत्रात त्या दिवशी घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर घटना उघडकीस आली आणि अधिकाऱ्यांनी त्या प्रवाशावर कारवाई केली. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर एव्हिएशन रेग्युलेटर डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने (डीजीसीए) विमान कंपनीकडून घटनेचा अहवाल मागविला होता.