एअर इंडियाच्या विमानातील बिझनेस क्लासमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. त्याहून धक्कादायक म्हणजे एअर इंडियाकडून हा प्रकार लपविण्याचा प्रयत्न झाला आहे. महिलेने याची तक्रार टाटा ग्रुपचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्याकडे केल्याने हा प्रकार समोर आला आहे.
मद्यधुंद अवस्थेतील एका व्यक्तीने महिलेवर लघवी केली आहे. ही घटना न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये घडली आहे. बिझनेस क्लासच्या कॉरिडॉरला लागून असलेल्या सीटवर महिला बसली होती. प्रवाशाने केलेल्या या कृत्याची तक्रार महिलेने विमानातील क्रू कडे केली होती. मात्र, तरीदेखील या क्रूने त्या प्रवाशाला पकडण्याचा प्रयत्न केला नाही. दिल्लीला गेल्यानंतर हा प्रवासी बिनदिक्कत घरी गेला. चंद्रशेखरन यांना महिलेचे पत्र मिळताच आता यावर कारवाई सुरु झाली आहे.
ही घटना २६ नोव्हेंबरची आहे. आता त्यावर कारवाई सुरु झाली आहे. अत्यंत संवेदनशील आणि वेदनादायक परिस्थितीच्या व्यवस्थापनात क्रू सक्रिय नव्हते. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर मला स्वत:च यावर बोलावे लागले आहे. विमान कंपनीने माझ्या सुरक्षिततेसाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत याचे मला दुःख झाले आहे, अशा शब्दांत या महिलेने आपली व्यथा मांडली आहे.
AI-102 फ्लाईट दुपारी १ वाजता न्यूयॉर्कहून रवाना झाली. थोड्याच वेळात जेवण झाले आणि लाईट बंद करण्यात आल्या. यानंतर एक प्रवासी माझ्या सीटजवळ आला, त्याने त्याच्या पँटची चेन खोलली आणि मला त्याचे गुप्तांग दाखवू लागला. लघवी केली तरी तो तिथेच थांबला होता. त्याच्यासोबतच्या सहप्रवाशाने त्याला जाण्यास सांगितले तेव्हा तो तिथून हटला. मी हा प्रकार केबिन क्रू ला सांगितला. माझे कपडे, चप्पल आणि बॅग लघवीमुळे भिजले होते. स्टाफने त्यावर किटानूनाशक फवारले. टॉयलेटमध्ये जाऊन कपडे साफ केल्यावर क्रूने मला पायजमा आणि डिस्पोजेबल चप्पल दिले, असे या पत्रात म्हटले आहे.
तिला तिच्या घाणेरड्या सीटवर परतायचे नव्हते म्हणून ती सुमारे 20 मिनिटे टॉयलेटजवळ उभी राहिली. त्यानंतर त्याला अरुंद क्रू सीट देण्यात आली. जिथे ती एक तास बसली आणि नंतर तिला तिच्या जागेवर परतण्यास सांगितले. कर्मचार्यांनी सीटवर चादर लावली होती तरीही त्या भागातून लघवीचा उग्र वास येत होता, अशी तक्रार या महिलेने केली आहे.
एअरलाइनच्या एका वरिष्ठ कमांडरने सांगितले, “केबिन क्रूने कंपनीच्या प्रक्रियेचे पालन केले पाहिजे. वैमानिकाला माहिती देऊन त्या अनियंत्रित प्रवाशाला बाहेर काढायला हवे होते. त्यानंतर उतरल्यावर त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात द्यायला हवे होते. एअर इंडियाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एअर इंडियाने या घटनेची माहिती पोलीस आणि नियामक प्राधिकरणांना दिली आहे. आम्ही पीडित प्रवाशाच्या नियमित संपर्कात आहोत.