कन्नूर: सोन्याची तस्करीसाठी विविध मार्गांचा वापर केला जातो. विमानतळावर अनेक जण सोन्याची तस्करी करताना पकडले जातात. मात्र तस्करी थांबत नाही. उलट त्यासाठी नवीन फंडे वापरले जातात. याचा प्रत्यय केरळच्या कन्नूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. जीन्स पँटच्या माध्यमातून सोन्याची तस्करी जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कन्नूर विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटनं (एआययू) आज सकाळी १४.६९ लाख रुपयांचं सोनं जप्त केलं. या सोन्याचं वजन ३०२ ग्रॅम इतकं आहे. एका जीन्स पँटवर पेंट करून सोन्याची तस्करी केली जात होती. पिवळ्या रंगाचा पेंट असलेली जीन्स परिधान केलेल्या एका तरुणाबद्दल अधिकाऱ्यांना संशय वाटला. त्यामुळे पोलिसांनी तरुणाचे कपडे उतरवले. त्यानं दोन थर असलेली पँट घातली होती. या दोन थरांच्या मध्ये त्यानं पेस्टच्या स्वरुपात सोनं लपवलं होतं.
एअर इंटेलिजन्स युनिटनं तरुणाच्या पँटची नीट तपासणी केली. जीन्सचे दोन थर अधिकाऱ्यांनी वेगळे केले. त्यात पिवळ्या रंगाचा पेंट दिसला. या पेंटची तपासणी केली असता ते सोनं असल्याचं आढळलं. सोन्याची पेस्ट मेटल डिटेक्टरमध्ये डिटेक्ट होत नाही. त्यामुळे सोन्याची पेस्टच्या स्वरुपात तस्करी करण्याचा प्रयत्न याआधीही झाला आहे.