मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या दहा दिवसांत कस्टम अधिकाऱ्यांनी जी-पेवरून लाच स्वीकारण्याच्या तीन घटना उजेडात आल्या असल्या तरी हे रॅकेट गेल्या वर्षभरापासून सुरू असल्याचे समजते आणि या प्रकाराला कस्टम विभागात कार्यरत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच, जी-पेवरून होणाऱ्या लाचखोरीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात ४७ लाख रुपये जमा झाल्याची माहितीदेखील तपास यंत्रणांतील सूत्रांनी दिली.
उपलब्ध माहितीनुसार, या लाचखोरीसाठी एक पद्धतशीर प्रणाली कस्टम अधिकाऱ्यांनी तयार केली होती. विमानतळ परिसरात सामानाची ने-आण करण्यासाठी जे लोडर आहेत त्यांनादेखील या प्रकारात सहभागी करून घेण्यात आले आहे. ज्यावेळी परदेशातून प्रवासी मुंबई विमानतळावर दाखल होतात त्यापैकी काही प्रवाशांना ठरवून त्यावेळी ड्यूटीवर सक्रिय कस्टम अधिकाऱ्यांची टीम टार्गेट करत होती. शक्यता एकटा प्रवासी असेल तर त्याला बाजूला घेऊन त्याच्या सामानाची झडती घेणे आणि त्यानंतर त्याला धमकावत त्याच्याकडून पैसे उकळले जात होते.
तसेच, अशा प्रवाशाकडून थेट रोख रक्कम स्वीकारण्याऐवजी त्या प्रवाशाला मोबाइल नंबर देत त्यावर जी-पे करायला लावले जात होते. हा जी-पे क्रमांक हा अधिकाऱ्यांपैकी कुणाचाही नसून हा नंबर प्रामुख्याने विमानतळावर कार्यरत लोडरचा होता. या लोडरच्या खात्यावर पैसे जमा झाल्यानंतर तो लोडर एटीएममधून ते पैसे काढून संबंधित अधिकाऱ्याला देत असे. तसेच, या मोबदल्यात त्या लोडरला त्या पैशांतून कमिशन दिले जात असे. सीबीआयने आता या प्रकरणाच्या मूळाशी जात त्याचा शोध सुरू केला आहे.
व्याप्ती अमर्यादसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दहा दिवसांत जरी केवळ तीन प्रकरणे उजेडात आली असली तरी हे रॅकेट वर्षभरापासून सुरू असून त्याद्वारे लोडरच्या खात्यामध्ये ४७ लाख रुपये जमा झाल्याचे नोंदीवरून दिसले. त्यामुळे या प्रकरणी अधिक तपास आता सीबीआय करत आहे. तसेच, या तीन पैकी दोन प्रकरणांमध्ये अधीक्षक दर्जाचे अधिकारी गुंतल्याचे निदर्शनास आल्यानंतर याची व्याप्ती केवळ अधीक्षकांपुरतीच मर्यादीत नाही तर त्यांचे वरिष्ठदेखील यामध्ये सहभागी असल्याचा संशय व्यक्त होत आहे.