नवी दिल्ली - तो २७ वर्षांचा होता जेव्हा पोलिसांनी त्याला पहिल्यांदा कोरोना काळात हत्येच्या गुन्ह्यात अटक केली होती. तिहार जेलला त्याला पाठवलं. जेलमधून तो त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी लवकरात लवकर बाहेर पडण्याची वाट पाहत होता. जेलमध्ये दोघांना आठवड्यातून दोनदा मिळण्याची परवानगी होती. एकदा जेलमधून बाहेर आलो तर तुला फिरायला घेऊन जातो, तुला तो ड्रेस घेऊन देतो असं बोलणं व्हायचं. हळूहळू वेळ निघून गेली, त्याच्या पत्नीचं जेलमध्ये येणेही कमी झालं. आकाश भाईडा या युवकाची कहाणी एका फिल्म स्टोरीपेक्षा कमी नाही.
मागील वर्षी २०२३ मध्ये आकाश जेलमधून बाहेर आला. बाहेर येताच त्याला सर्वाधिक आनंद पत्नीला भेटण्याचा झाला होता. जेलमधून बाहेर पडलेला आकाश पत्नीला भेटण्यासाठी खूप उत्सुक होता. तो एका फुलांच्या दुकानात गेला तिथे बुके घेतला. आकाश घरी पोहचला त्याठिकाणी बेल वाजवली, त्यानंतर दरवाजा उघडताच चेहऱ्यावरील सर्व आनंदावर विरजन पडलं. ती घरात नव्हती. निराश होऊन त्याने तिचा शोध घेतला. परंतु ती सापडली नाही. त्यानंतर काही काळाने त्याची पत्नी तिला सोडून एका मोठ्या कॉन्ट्रेक्ट किलरसोबत गेली होती. ती राजनसोबत होती. त्यामुळे आकाशला संताप अनावर झाला.
राजनला ठार मारायचा या भावनेतून त्याच्या मनात आग पेटली होती. परंतु राजन छोटा मोठा माणूस नव्हता. तो एका बड्या गँगस्टरचा राईट हँड होता. ज्याला जेलमध्ये गँगस्टर लॉरेन्स बिस्नोईपासून संरक्षण मिळालं होतं. आकाशकडे राजनशी बदला घेणे आणि पत्नीला परत आणण्याचा कुठला मार्ग नव्हता. परंतु बदला घेण्याची भावना माणसाला काहीही करण्यास भाग पाडू शकते म्हणतात, तसेच झाले. बड्या गँगशी मुकाबला करण्यासाठी आकाशनेही स्वत:ची गँग बनवली. दिल्लीच्या एनसीआर भागात जबरदस्तीने दरोडा, लुटमार याचे नेटवर्क तयार केले. गँग बनली. त्यानंतर तो राजनची रेकी करू लागला. त्याला राजनबाबत माहिती मिळाली. १ सप्टेंबर २०२३ रोजी त्याचा सामना राजनशी झाला. आकाशने राजनच्या कालिंदी कुंज येथील घराला आग लावली परंतु राजन तिथून जीव मुठीत घेऊन पळून गेला.
आकाशचा पहिला डाव फसल्यानंतर त्याचा राग आणखी वाढला होता. जवळपास ७ महिने शोध आणि रेकी केल्यानंतर राजनचा पत्ता पुन्हा लागला. आकाश गँगशी बोलून पूर्ण प्लॅनिंग करत होता. मिशन पूर्ण करण्याची तयारी सुरू होती मात्र त्याची भनक पोलिसांना लागली. त्यानंतर आकाश त्याचा डाव पूर्ण करणार इतक्यात रस्त्यात पोलिसांनी अडवलं. त्यामुळे राजनला मारण्याचा दुसरा कटही फसला. कालिंदी कुंज आग प्रकरणापासून पोलीस आकाशच्या मागावर होती.
पोलिसांनी आधीच तयारी केली होती...
एसपी नरेश सोलंकी म्हणाले की, आकाश उर्फ कानाविरोधात अनेक गुन्हे पहिल्यापासून नोंद आहेत. कधीकाळी राजन आणि आकाश जिगरी मित्र होते. परंतु आकाशच्या बायकोलाच राजनने पळवलं त्यामुळे त्याला राग आला होता. याच रागातून राजनचा काटा काढायचा प्लॅन आकाश आखत होता. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली. तपासात आकाशने सर्व कहाणी पोलिसांना सांगितली.