अकोला : दोन हत्यांच्या घटनांनी शनिवारी रात्री शहर हादरले. त्यामध्ये जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवसेना वसाहतीत क्षुल्लक कारणावरून मित्रानेच मित्राची हत्या केली, तर दुसऱ्या घटनेत रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जठारपेठ येथे लाथाबुक्क्यांनी एका युवकाची हत्या करण्यात आली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुने शहरातील शिवसेना वसाहत येथील रहिवासी बाबूलाल शेळके व अमर ऊर्फ विकी अग्रवाल हे दोघे मित्र असून, शनिवारी रात्री ते दोघे जण सोबत होते. यावेळी अमर व बाबूलाल या दोघांमध्ये वाद झाला. या वादातूनच अमरने बाबूलाल यांना मस्करीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या कारणामुळे दोघांमध्ये आणखी वाद वाढल्याने या वादातूनच अमर अग्रवाल याने बाबूलाल शेळके यांच्या मानेवर जोरात लाथ मारल्याने शेळके यांचा जमिनीवर कोसळून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. यावेळी शहर पोलीस उपाधीक्षक सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ, जुने शहरचे ठाणेदार महेंद्र देशमुख यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी अमर ऊर्फ विकी अग्रवाल यास तातडीने अटक केली.
जठारपेठेत युवकाची हत्या
अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जठारपेठ परिसरात असलेल्या रिजन्सी लॉन्सच्या पाठीमागे याच परिसरातील रहिवासी असलेल्या एका युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या हत्येनंतर अज्ञात मारेकरी फरार झाले असून, पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
दिवेकर आखाडा परिसरात असलेल्या अन्नपूर्णा अपार्टमेंटमधील रहिवासी सौरभ सुळे हा युवक त्याच्या मित्रांसोबत रिजन्सी लॉन्सच्या पाठीमागे शनिवारी सायंकाळी बसलेला होता. यादरम्यान सौरभच्या मित्रांनी या ठिकाणी मद्यप्राशन केल्याची माहिती आहे. मद्यप्राशन केल्यानंतर त्यांच्यात आपसात वाद सुरू झाला. या वादातच पैशाच्या देवाण-घेवाणीचाही विषय निघाल्याने, तसेच नशेत असलेल्या युवकांनी सौरभला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. अशातच मारेकऱ्यांनी सौरभच्या छातीवर व पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. सौरभचा मृत्यू झाल्याचे पाहताच अज्ञात मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले. काही वेळेनंतर हा मृतदेह परिसरातील नागरिकांना दिसला. त्यांनी रामदासपेठ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी सध्यातरी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, सौरभची हत्या झाल्याचे जवळपास निष्पन्न झाले असून पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला आहे. त्यामुळे पोलीस लवकरच आरोपींना बेड्या ठोकणार असल्याची माहिती आहे.
सौरभचा मृत्यू हा मारहाणीत झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सध्यातरी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, रविवारी हत्येचा गुन्हा दाखल करून या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात येणार आहे.
सचिन कदम
शहर पोलीस उपअधीक्षक, अकोला.