अकोला : सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरुकुल कोचिंग क्लासमध्ये केमिस्ट्री विषय शिकविणाऱ्या संदीप सहदेव वानखडे नामक प्राध्यापकाने कोचिंग क्लासमध्ये शिक्षणासाठी आलेल्या डाबकी रोडवरील विद्यार्थिनीस फूस लावून शेगाव येथे नेऊन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी मुलीने प्रथम सिव्हिल लाइन त्यानंतर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात संदीप वानखडेविरुद्ध तक्रार दिली असून, पोलिसांनी रात्री उशिरा वानखडेविरुद्ध फूस लावून नेणे व विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला.शिवर येथील रहिवासी असलेला संदीप सहदेव वानखडे हा प्राध्यापक असून, गुरुकुल कोचिंग क्लासेस येथे तो अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना रसायनशस्त्र विषय शिकवितो. गुरुवारी त्याने डाबकी रोडवरील रहिवासी असलेल्या एका विद्यार्थिनीला बिस्लेरीमध्ये गुंगीचे औषध देऊन विद्यार्थिनीला सकाळी थेट शेगाव येथे नेल्याचे विद्यार्थिनीचे म्हणणे आहे. त्यानंतर त्याने या ठिकाणी युवतीचा विनयभंग केला. सायंकाळी युवतीला जाग आल्यानंतर ती शेगावात असल्याचे तिला दिसले. तिने तातडीने अकोला गाठून घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला, त्यानंतर कुटुंबीयासह विद्यार्थिनीने सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली; मात्र हद्दीची अडचण असल्याने या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी विद्यार्थिनी व तिचे नातेवाईक सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचले. या ठिकाणी संदीप वानखडे याची तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी संदीप वानखडेविरुद्ध ३५४, ३६३, ३६६ नुसारचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
युवतीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते दोघे!डाबकी रोडवरील युवतीचा गुरुवारी वाढदिवस असल्याने प्राध्यापक संदीप वानखडे यांनी तिला वाढदिवस साजरा करण्याच्या कारणावरून शेगाव येथे नेले, त्यानंतर तेथील एका हॉटेलमध्ये तिचा विनयभंग केल्याची माहिती समोर आली आहे. युवतीच्या वाढदिवसाचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याचे तिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.