जितेंद्र कालेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे, डोंबिवली आणि अंबरनाथ भागांतील सुमारे १२०० गुंतवणूकदारांची २५ कोटींची फसवणूक करणाऱ्या ‘गुडविन ज्वेलर्स’च्या सुनीलकुमार आणि सुधीरकुमार अकराकरण यांची केरळसह इतर ठिकाणी ५० कोटींच्या २१ मालमत्ता आढळल्या आहेत. त्यातील बहुतांश मालमत्ता जप्त केल्या असून वर्षभरात त्यांच्या लिलावातून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करता येऊ शकतील, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने दिली.
ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग आणि आर्थिक गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस उपायुक्त संजय जाधव आणि सहायक आयुक्त सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होती. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जाधव, नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, शंकर चिंदरकर आणि वनीता पाटील आदींचा समावेश होता. महाराष्टÑात फसवणुकीनंतर अकराकरण बंधूंनी केरळातील त्रिशूर जिल्ह्यात जमीन आणि स्थावर मालमत्ता खरेदीमध्ये मोठी गुंतवणूक केली.
केरळमध्येच त्यांची एक तीन मजली इमारत आहे. याशिवाय, आलिशान मॉल, सुमारे ९० एकर जमीन, बंगले, रिसॉर्ट अशा ४० ते ५० कोटींच्या २१ मालमत्ता आढळल्या आहेत. यातील अनेक मालमत्तांची त्यांच्याच नातेवाइकांच्या मदतीने खातरजमा केल्यानंतर त्या सीलबंद केल्या आहेत. दोन मर्सिडीज कारसह फॉर्च्युनर, इनोव्हा अशा दीड ते दोन कोटींच्या १० कारचाही त्यामध्ये समावेश आहे. बँकेतही दीड कोटींची रक्कम आढळली असून ती खातीही गोठविली आहेत. ठाण्यातील नौपाडा, डोंबिवलीतील मानपाडा, अंबरनाथच्या शिवाजीनगर या पोलीस ठाण्यांमध्ये ११५४ गुंतवणूकदारांची त्यांनी २५ कोटींची फसवणूक केल्याचे आढळले. मात्र, पालघर, नवी मुंबई, पुण्यातील पिंपरी-चिंचवड आणि ठाणे ग्रामीण अशा विविध ठिकाणीही या ज्वेलर्सने तीन ते चार हजार गुंतवणूकदारांची ९० कोटींपेक्षा अधिक फसवणूक केली.कोठडीत वाढ करण्याची मागणीसुरुवातीला ठाणे पोलिसांना त्यांची २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे, परंतु त्यांच्या मालमत्तांची, तसेच यातील आणखी फरारी आरोपींची माहिती मिळविण्यासाठी अकराकरण बंधुंच्या पोलीस कोठडीमध्ये आणखी वाढ करण्यासाठी ठाणे न्यायालयाकडे आर्थिक गुन्हे शाखेकडून मागणी केली जाणार आहे. ती मिळाल्यानंतर इतरही जिल्ह्यातील पोलीस त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.