म्हापसा - दारुच्या नशेत प्रवासी बसची वाहतूक करणाऱ्या बस चालकाला नशा बरीच महागात पडली. प्रवाशांचा जीव धोक्यात घालून वाहतूक करणाऱ्या या वाहन चालकाला म्हापशातील न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहाची सजा भोगण्याची पाळी त्याच्यावर आली. आल्कोमीटरवर तो नशेत असल्याचे सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने त्याला ३ हजार रुपयांचा दंड तसेच ५ दिवसांच्या कैदेची शिक्षा फर्मावली आहे.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाडी- नादोडा येथील बस चालक विशांत पाडेलकर हा चालवत असलेली बस घेवून म्हापशातील बस स्थानकात प्रवेश करण्याच्या तयारीत असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेले वाहतूक निरीक्षक तुषार वेर्णेकर यांनी त्याला गुरुवारी संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमाराला अडवले. त्यावेळी त्याची आल्कोमीटरच्या सहाय्याने चाचणी घेण्यात आली. घेतलेल्या चाचणीत त्याने मर्यादेपेक्षा जास्त दारुचे सेवन केल्याचे तपासात आढळून आले. शुक्रवारी त्याला प्रथम वर्ग न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दोषी ठरवून ३ हजार रुपयांचा दंड व पाच दिवसाची साधी कैदेची शिक्षा फर्मावली. या बस उत्तर गोव्यातील रेवोडा ते म्हापसा या मार्गावर वाहतूक करीत होती.
मागील काही दिवसा पासून गोव्यात नशेत वाहने चालवणाऱ्या विरोधात सक्तपणे कारवाई करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. दिवसा बरोबर रात्रीच्यावेळी सुद्धा चालकांची तपासणी केली जाते. त्यात पर्यटकांचा सुद्धा समावेश आहे. महाराष्ट्रातून गोव्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर तर तपासणीची सक्तपणे अंमलबजावणी केली जाते. तसेच किनारी भागात सुद्धा त्याची सक्तपणे अंमलबजावणी केली जाते. म्हापसा पोलीस स्थानकातील वाहतूक निरीक्षक तुषार वेर्णेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार नशेत वाहने चालवणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात कारवाई करण्याची मोहिमेची अंमलबजावणी यापुढे सक्तपणे केली जाणार आहे.