नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्थानिक भरारी पथक-१च्या चमूने मिळालेल्या गोपनीय माहितीच्याअधारे त्र्यंबकेश्वरजवळील सापगाव फाट्यावर सापळा रचत प्रतिबंधित मद्याची तस्करी गांधी सप्ताह’च्या पहिल्याच दिवशी रोखण्यास यश मिळविले. केवळ केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी निर्मित सुमारे ४८०मद्याच्या बाटल्यांचा साठा चक्क इनोव्हासारख्या कारमधून वाहून शहरात आणला जात होता.
राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाकडून गांधी सप्ताहमध्ये मद्याची अवैध तस्करीविरोधात धडक मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत विभागीय उपआयुक्त अर्जुन ओहोळ यांच्या आदेशान्वये उत्पादन शुल्क विभागाच्या सर्वच भरारी पथकांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात कोठेही अवैधरित्या मद्याची तस्करी होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सुचना करण्यात आल्या असून ‘नेटवर्क’ अधिकाधिक सक्रीय करण्यास सांगण्यात आले आहे.भरारी पथकाचे निरिक्षक जयराम जाखेरे यांना एका गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी पथकासह शनिवारी (दि.२) मध्यरात्री त्र्यंबकेश्वरच्या सापगाव फाट्यावर सापळा रचला. गुप्त माहितीनुसार संशयास्पद इनोव्हा कार (एम.एच०५ सीए २८८८) मध्यरात्री सीमावर्ती भागातून भरधाव येताना दिसली. पथकाने सावध होऊन शिताफिने कार अडविण्यास यश मिळविले; मात्र अंधाराचा फायदा घेऊन कारचालक हा पसार होण्यास यशस्वी झाला.
इनोव्हा कारची झडती घेतली असता कारच्या मुळ अंतर्गत रचनेत बदल करत संशयित मद्य तस्करांकडून प्रतिबंधित विदेशी मद्य ब्लेंडर्स प्राईड व्हिस्कीच्या ७५० मि.ली.क्षमतेच्या ६० सिलबंद बाटल्या, इम्पॅरियल ब्लु व्हिस्कीच्या ७५० मि.ली. क्षमतेच्या ४२० सिलबंद बाटल्यांचा हा मद्यसाठा चोरट्या पध्दतीने वाहून नेला जात होता. वाहनाची झडती घेत पथकाने हा साठा वाहनासह ताब्यात घेतला. इनोव्हासह मद्यसाठा असा एकुण १२ लाख ८३हजारांचा मुद्देमाल या कारवाईत हस्तगत करण्यात आला आहे.