रायगड : विराेधात तक्रारी करणाऱ्याला खोट्या प्रकरणात अडकवणे काँग्रेसच्या नेत्याला महागात पडले आहे. अलिबागपोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. प्रकृती बिघडल्याच्या कारणावरून अॅड. उमेश ठाकूर रुग्णालयात दाखल केले आहे.
आरोपी अॅड. उमेश ठाकूर यांचा व्यवसाय अवैध आहे. याबाबत पेण तालुक्यातील कोलेटी येथील काशीनाथ ठाकूर हे विविध कार्यालयात तक्रारी करत होते. त्यामुळे उमेश ठाकूर याला व्यवसायात मोठे नुकसान होत होते. आपल्या विरोधातील तक्रारीने उमेश ठाकूर हैराण झाला होता. त्यांनी काशीनाथ ठाकूर यांचा काटा काढण्याचे षड्यंत्र रचले. शुभम गुंजाळ यांच्या मदतीने काशीनाथ ठाकूर यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले. तसेच आपल्याच ओळखीतील मनिषा चोरडेकर हिला त्यावरुन अश्लील व्हिडिओ आणि मेसेजेस पाठवले.या व्हिडिओ आणि मेसेजच्या आधारे मनिषा चोरडेकर हिने काशीनाथ ठाकूर यांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
तपासीक अंमलदार पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी सायबर सेलची मदत घेतली. सायबर सेलने केलेल्या तपासात धक्कादायक बाब समोर आली. यात शुभम गुंजाळ हा सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्याची सखोल चौकशी केली असता उमेश ठाकूर हा या कटाचा सूत्रधार असल्याचे समोर आले. महत्वाचे म्हणजे ज्या महिलेने तक्रार दिली होती ती मनिषा चोरडेकर या कटात सहभागी होती.अॅड. उमेश ठाकूर, शुभम गुंजाळ आणि मनिषा चोरडेकर या तिघांनाही न्यायलयाने 11 जानेवारी राेजी तीन दिवसांची पाेलिस कस्टडी दिली हाेती. प्रकृतिच्या कारणाने उमेश सरकारी रुग्णालयात आहे. आज दुपारी तिनही आराेपींना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.