रायगड - पेण मळेघर आदिवासी वाडीवरील पीडित तीन वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार करून तिला जीवे मारण्याची घटना 29 डिसेंबर 2020 राेजी घडली होती. याबाबतचा खटला अलिबागच्या जलदगती न्यायालयात सुरु झाला आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी या प्रकरणी आज पाच साक्षीदारांची साक्ष तपासली. मंगळवारी देखील उर्वरित साक्षीदारांची साक्ष तपासण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील अॅड. भूषण साळवी यांनी दिली.
29 डिसेंबर 2020 साली पेण मधील मळेघर आदिवासी वाडीवरील तीन वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली हाेती. या घटनेनंतर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली हाेती. पोलिसांनी या घटनेचा तपास करून आरोपी आदेश पाटील याला अटक केली. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. ताे अलिबाग येथे शिक्षा भोगत होता. पॅरोलवर ताे त्या कालावधीत बाहेर हाेता. घरी आल्यावर त्याने हे घ्रुणास्पद कृत्य केले हाेते. पेण पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा यासाठी राजकीय तसेच सामाजिक संघटनांनी जाेरदार मागणी केली होती. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्वल निकम याची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड भूषण साळवी हे सहाय्यक म्हणून काम पाहत आहेत.